सरकारने दगा फटका केला तर…, मनोज जरांगे पाटील यांच्या मुलीनं पुढाऱ्यांना भरला दम
मनोज जरांगे पाटील यांची मुलगी पल्लवी जरांगे पाटील हिने सरकारला इशारा दिला आहे. वडिलांच्या जीवाचं बर वाईट झालं तर सरकार जबाबदार असणार आहे. जसं वाघ असतो तसेच त्याचे बिछडे असतात. जर वडिलांनी ठरवलं तर..., मनोज जरांगे पाटील यांच्या मुलीनं सरकारला काय दिला इशारा?
धाराशिव, ३ नोव्हेंबर २०२३ : मनोज जरांगे पाटील यांची मुलगी पल्लवी जरांगे पाटील हिने सरकारला इशारा दिला आहे. वडिलांच्या जीवाचं बर वाईट झालं तर सरकार जबाबदार, मनोज जरागे यांना अटक झाली तर सरकार राहील की नाही माहिती नाही, असेही ती म्हणाली. मनोज जरांगे यांच्या परिवाराने तुळजाभवानी मातेचे आज दर्शन घेऊन साडी चोळी ओटी भरून आरती केली. यावेळी जरांगेच्या मुलीने प्रतिक्रिया दिली. सरकारने दगा फटका केला तर मुंबईचं नाक बंद होणार आणि तरीही नाही ऐकलं तर या सरकारचंही नाक बंद होईल. वडिल जिद्दी आहेत. जसं वाघ असतो तसेच त्याचे बिछडे असतात. जर वडिलांनी ठरवलं तर अख्खा मराठा समाज त्यांच्या पाठिशी उभं राहिल, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांच्या मुलीने विश्वास व्यक्त केला आहे. पुढे ती असेही म्हणाले की, डॉक्टरांनी पुन्हा वडिलांना उपोषण करू नका, असे सांगितले होते. कितीही मेळावे काढा पण या सरकारला या उपोषणाशिवाय जाग येत नाही, त्यामुळे मी भावनिक झाले होते. कारण एक मुलगी म्हणून आणि कुठल्या मुलीला आपल्या बापाची काळजी वाटत नाही, त्यामुळे मला वडिलांनी उपोषण करू नये असे वाटत होते.