‘शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेल्यानं बदनामी झाली पण…’, बच्चू कडू यांनी काय केलं मोठं वक्तव्य
VIDEO | 'एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला जाण्याचा योग आला तेव्हा देवेंद्र फडणीस यांनी फोन करून आपल्यासोबत यावं असं म्हटलं होतं, पण मी.... ', आमदार बच्चू कडू यांनी नेमका काय केला मोठा गौप्यस्फोट?
सांगली, २४ ऑगस्ट २०२३ | ‘महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मी दहावेळा दिव्यांग मंत्रालय उभारा ही मागणी केली. राज्यमंत्री असूनही माझी मागणी पूर्ण झाली नाही’, अशी खंत सांगली येथे दिव्यांग बांधवांच्या जिल्हास्तरीय मेळाव्याचे उद्घाटनावेळी आमदार बच्चू कडू यांनी बोलून दाखवली. यावेळी बोलत असताना त्यांनी मोठा गोप्यस्फोटही केल्याचे पाहायला मिळाले. ‘योगायोगाने गुवाहाटीला जाण्याचा योग आला. त्यावेळी देवेंद्र फडणीस यांनी फोन करून आपल्यासोबत येण्यास म्हटले. त्यावेळी मी तुमच्यासोबत येईन पण दिव्यांग मंत्रालय स्थापन करत असाल तरच… नाहीतर तुमच्यासोबत येत नाही असे स्पष्टच सांगितले. नंतर पुन्हा गुवाहाटीला गेलो. त्यावेळी एकनाथ शिंदे यांना सांगितले, दिव्यांग मंत्रालय स्थापन करायचा शब्द तुम्ही पूर्ण करायला हवा. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना संपर्क साधला आणि दिव्यांग मंत्रालय मिळाले’, असे बच्चू कडू म्हणाले. पुढे ते असेही म्हटले की, गुवाहाटीला जाण्यामुळे आमची राज्यात बदनामी झाली. पण त्या बदनामीची पर्वा नाही. त्या बदनामीच्या बदल्यात आम्हाला दिव्यांग मंत्रालय मिळालं, असे सांगत बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभारही मानले.