MNS : राज ठाकरेंच्या FB पोस्टनंतर आता दादरमध्ये जागोजागी ‘हिंदी’विरोधात तुफान बॅनरबाजी, ‘हिंदू आहोत पण…’
राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. मनसेकडून या हिंदी भाषा सक्तीला विरोध दर्शविण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील मराठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आता पहिलीपासून ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी इंग्रजीबरोबर आता हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली आहे. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच भडकले आहे. पहिलीपासून हिंदी सक्तीची करण्याच्या नव्या शैक्षणिक धोरणावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतल्याचे पाायला मिळत आहे. काल राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर केंद्राचं सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदी भाषा सक्ती खपवून घेणार नाही, असं म्हटलं होतं. त्यानंतर आता मुंबईत दादर भागात महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीला विरोध दर्शविणारे जागो-जागी बॅनर झळकल्याचे पाहायला मिळत आहे. पहिलीपासूनच हिंदी भाषा सक्तीची केल्यानंतर मनसे आक्रमक झाली असून आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही… असा आशय असणारे बॅनर दादारमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण कडून लावण्यात आले आहे. तर दुसरीकडे एका बॅनरवर पोस्टकार्ड छापलं असून एक पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठी भाषा मंत्री यांना लिहिल्याचे दिसतंय. यामध्ये आपुल्या घरात हाल सोसते मराठी.. असं म्हणत हिंदी भाषा सक्ती करण्यात आल्यानंतर हिंदी भाषेला महाराष्ट्रात विरोधक दर्शविण्यात आला आहे.