राज ठाकरेंचा कधी याला पाठींबा तर कधी त्याला…पुढच्या राजकीय वाटचालीचं मनसेचं ‘इंजिन’ नेमकं कोणत्या दिशेनं?
लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी मोदींना पाठींबा दिला आणि आता नुकत्याच झालेल्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून राज ठाकरे यांनी फडणवीसांना देखील पाठींबा असल्याचं सांगितलंय. चांगल्या कामांसाठी फडणवीसांना आमचा पाठींबा आहे असं राज ठाकरे म्हणाले. दरम्यान पुढच्या राजकीय वाटचालीचं मनसेचं इंजिन नेमकं कोणत्या दिशेने आहे?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठींबा दिला. चांगल्या कामासाठी फडणवीसांना पाठींबाच असेल, फक्त आम्हाला विचारून निर्णय घ्या, असं राज ठाकरे म्हणाले. इकडे राज ठाकरे यांनी पाठिंब्याची भाषा केली तर दुसरीकडे फडणवीसांनीही राज ठाकरेंच्या मुद्यांचा विचार करू म्हणत सकारात्मक प्रतिसाद दिला. सध्याची महायुतीची परिस्थिती पाहिली तर 230 पेक्षा अधिक आमदारांच्या आकड्याची भक्कम आघाडी आहे. तसं पाहिलं तर मनसेचा एकही आमदार नाही त्यामुळे पाठिंब्याच्या आकडेवारीत तरी काहीच फरक पडत नाही. मात्र महायुती आणि विशेषतः भाजपसाठी मनसेचा पाठींबा म्हणजे विरोधकांमधील एक विरोधक कमी करण्यासारखा आहे.
राज ठाकरेंची राजकीय भूमिका कधी याला पाठींबा तर कधी त्याला पाठींबा अशीच राहिली आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना पाठींबा दिला. 2019च्या लोकसभा निवडणुकीत मात्र मोदींच्या विरोधात भूमिका घेतली आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या विरोधात प्रचार केला. 2024च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा मोदींना पाठींबा दिला. 2024च्याच विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये येण्याचा प्रयत्न केला मात्र फिसकटलं आणि स्वतंत्र उमेदवार देत भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार अशी भूमिका घेतली, मात्र मनसेचा एकही आमदार आला नाही. आता मराठी आणि चांगल्या कामांसाठी फडणवीसांना पाठींबा जाहीर केला आहे.