Prakash Mahajan : आशिष शेलार व्यवहारशून्य, त्या माणसाची बौद्धिक दिवाळखोरी…; मनसे नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेनंतर मनसे कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी बॅनरबाजी केली जात असताना ठाकरे बंधु एकत्र येण्यासंदर्भात कुठेही बोलू नका, अशा थेट सूचना मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांना दिल्यात
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत आणि ते दोघे एकत्र येण्यासंदर्भात कुठेही बोलू नका, अशा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकारी नेत्यांना दिल्या असल्याची माहिती समोर येत आहे. यावर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘राज ठाकरे सध्या परदेशात आहेत. ते भारतात परत आल्यावर राज ठाकरे हे युतीबाबत जी काही भूमिका असेल ती जाहीर करतील.’ पुढे त्यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावरही खोचक निशाणा साधला आहे. प्रकाश महाजन यांनी आशिष शेलार यांचा उल्लेख व्यवहारशून्य असा केला. दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबतआशिष शेलारांना सवाल केला असता आता वैयक्तिक मित्र विषय संपला असं म्हणत आशिष शेलार यांनी त्यांची भूमिका जाहीर केली होती. या भूमिकेवरच प्रकाश महाजन यांनी भाष्य केले आहे. ‘मुंबई भाजप पक्षाचा अध्यक्ष, आमदार आणि आता मंत्री आहेत. मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणजे राज ठाकरे.. आणि आशिष शेलार त्यांच्याशी मैत्री ठेवणार नाही. त्या माणसाची बौद्धिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल’, असं प्रकाश महाजन म्हणाले.