मुंबई-नाशिक महामार्गवर रस्त्यांची चाळण, महामार्गवर वाहतूक कोंडी; प्रशासनाचं दुर्लक्ष
VIDEO | मुंबई-नाशिक महामार्गवर खड्डेच खड्डे, खड्ड्यातून प्रवास करताना वाहन चालकांची तारांबळ
मुंबई, ३० जुलै २०२३ | बांधा वापरा हस्तांतरीत करा बी ओ टी तत्वावर देशात विकसित झालेला पहिला रस्ता अर्थातच मुंबई नाशिक महामार्ग. परंतु सध्या या रस्त्याची दुर्दशा एखाद्या गावखेड्यातील रस्त्यांसारखी झाली आहे. जून पाठोपाठ जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने मुंबई नाशिक महामार्गाची चाळण झाली आहे. महामार्गवर खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावल्याने प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना करावा लागत आहे. जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने महामार्गवर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. या रस्त्याची जबाबदारी असणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. कधी कधी ओरड झाली की खड्ड्यांमध्ये पेवरब्लॉक लावण्याची डागडुजी केली जाते. पण मुसळधार पावसात ही थुकपट्टी सुद्धा उघडून गेली आहे. त्यामुळे या महामार्गा वर दर दहा ते पंधरा मीटर अंतरावर दीड ते दोन फुटापर्यंतचे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना तर करावा लागतोच पण या खड्ड्यांमुळे अनेक वाहन नादुरुस्त होऊन तो वेगळा आर्थिक भुर्दंड विशेषतः चालकांना सोसावा लागत आहे. परंतु प्रशासन खड्डे बुजविण्याची कोणतीही तसदी घेताना दिसत नाही .