VIDEO | एनसीबीची मोठी कारवाई, 50 कोटींचे ड्रग्स पकडले; तिघांना अटक, एका महिलेचा समावेश
याआधी एकदा एनसीबीने अशीच एक मोठी कारवाई डोंगरी परिसरात केली होती ज्यात दाऊद टोळीशी संबंधित लोकांना अटक झाली होती.
मुंबई : मुंबई एनसीबीने डोंगरी परिसरात मोठी कारवाई करत 50 कोटींचे ड्रग्स पकडले आहे. एनसीबीचे मागच्या काही दिवसात केलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जातीय. डोंगरी परिसरात ड्रग्स संदर्भातल्या अनेक मोठ्या कारवाया मुंबई पोलीस आणि एनसीबीकडून केल्या जातात. मात्र एनसीबीने काल केलेली ही कारवाई पाहता या कारवाईनंतर काही कनेक्शन्स उघड होण्याची शक्यता आहे. एनसीबीने केलेल्या कारवाईत 45 ते 50 कोटी किमतीचे 20 किलो एमडी ड्रग्स, 1 कोटी 10 लाख रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागीनेही जप्त करण्यात आलेत. या प्रकरणात एकूण तिघांना अटक केलीय. ज्यात एका महिलेचा समावेश आहे. आरोपी महिला या प्रकरणात मास्टरमाईड असल्याचं बोललं जातंय. एनसीबीचे विभागीय संचालक अमित घवाटे यांच्या नेतृत्वात डोंगरीतली कारवाई करण्यात आलीय. तर याआधी एकदा एनसीबीने अशीच एक मोठी कारवाई डोंगरी परिसरात केली होती ज्यात दाऊद टोळीशी संबंधित लोकांना अटक झाली होती.