तब्बल 17 तास नॉट रिचेबल असलेले अजित पवार म्हणाले…
VIDEO | नॉट रिचेबल असण्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्वतः दिलं स्पष्टीकरण, काय म्हणाले बघा व्हिडीओ
पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे अवघ्या राज्याचं लक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याकडे लागलं आहे. दरम्यान, विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे कालपासून नॉट रिचेबल असल्याचे वृत्त आणि चर्चा सुरू होत्या. कालपासून अजित पवार संपर्कात नव्हते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले होते. अजित पवारांसोबत काही आमदार असल्याच्याही चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र आज सकाळीच अजित पवार एका लग्नसमारंभात दिसून आले. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, मला पित्ताचा त्रास होत असल्याने मी आराम करण्यास घरी गेलो, आराम केल्यानंतर मला बरं वाटलं आणि पुन्हा सकाळपासूनचे कार्यक्रम सुरू केले. आम्ही राजकीय क्षेत्रात काम करत असलो आणि सार्वजनिक चेहरा असलो तरी कधीकधी त्रास होतो आणि विश्रांती घ्यावी लागते. पण त्याची शहानिशा न करता चुकीच्या बातम्या दिल्या जातात. अशावेळी मनाला वेदना होतात, असे ते म्हणाले.