निर्मला सीतारामन येताच सुप्रिया सुळे ॲक्शन मोडमध्ये; बारामतीच्या गावागावात जाणार
आज मळद, गुणवडी, डोर्लेवाडी, झारगडवाडी, सोनगाव, मेखळी, घाडगेवाडी, निरावागज, खांडज, शिरवली, सांगवी अशा अकरा गावांना सुप्रिया सुळे भेट देणार आहेत.
पुणे: भाजपने (bjp) राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यातही भाजपने पवार कुटुंबीयांचं वर्चस्व असलेल्या बारामती (baramati) लोकसभा मतदारसंघावर भाजपने अधिकच लक्ष दिलं आहे. स्वत: केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन या बारामतीत येऊन गेल्या. त्या बारामतीत वारंवार येणार आहेत. त्यामुळे पवार कुटुंबीय सतर्क झाले आहेत. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी सीतारामन यांच्या दौऱ्याला गांभीर्याने घेतलं आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी बारामतीतील प्रत्येक गाव पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. या दौऱ्याची सुरुवात बारामती तालुक्यातील मळद या गावातून करण्यात आली आहे. आज डोर्लेवाडी-सांगवी जिल्हा परिषदेचा मतदारसंघ असलेल्या मळद, गुणवडी, डोर्लेवाडी, झारगडवाडी, सोनगाव, मेखळी, घाडगेवाडी, निरावागज, खांडज, शिरवली, सांगवी अशा अकरा गावांना सुप्रिया सुळे भेट देणार आहेत. त्या भागातील अडचणी जाणून घेऊन मतदारांशी संवाद साधणार आहेत.