राष्ट्रवादीच्याच बड्या नेत्यांवर रोहित पवार भडकले; म्हणाले, ‘फक्त अजित पवार यांनीच ठेका…’
VIDEO | रोहित पवार यांनी आपल्याच पक्षाच्या बड्या नेत्यांना सुनावले खडेबोल, पण का?
मुंबई : भाजप नेते आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 5 जूनला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अतिशय खोचक शब्दांत टीका केली होती. त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना आरे-तुरेची भाषा वापरली होती. तसेच भाजप नेते गोपीचंद पडळकर सातत्याने शरद पवार यांच्यावर टोकाची टीका करत असतात. त्यांच्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. अजित पवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. त्यांच्याकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती, असं अजित पवार म्हणाले. मुनगंटीवार यांच्या टीकेला राष्ट्रवादीकडून अजित पवार वगळता कुणी प्रत्युत्तर दिलं नाही म्हणून आमदार रोहित पवार संतापले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांना सुनावलं.
आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना चांगल्याच कडक शब्दांत सुनावलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीच बोलण्याचा ठेका घेतला आहे का? असा प्रश्न रोहित पवार यांनी आपल्या पक्षाच्या बड्या नेत्यांना विचारला आहे. राष्ट्रवादीचे इतर नेते का बोलत नाहीत? वाचाळवीरांना का प्रतिक्रिया देत नाहीत? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.