‘लाथ मारलेलं कुत्र्याचं पिलूही घुटमळतं… डिस्टर्ब करतं, नार्वेकरांच्या चर्चाही अशाच’
बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत निष्ठावान, त्यांच्यासाठी जेवण तयार करणारे चरणसिंह थापा यांचा शिंदे गटात प्रवेश झाल्यानंतर आता मिलिंद नार्वेकरांच्या नावाचीही काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु आहे.
मुंबईः मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) लवकरच शिंदे गटात येतील, ही चर्चा सध्या जोरात सुरु आहे. मात्र या सगळ्या अफवा आहेत. त्या कोण पसरवतं माहिती नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी दिली आहे. धुळ्यात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर मिलिंद नार्वेकरांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र अजून तसं काही नाहीये, अशी प्रतिक्रिया दिलीय.
नार्वेकरांच्या बातमीबद्दल प्रतिक्रिया देताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या, मिलिंद नार्वेकर असं काही करतील, असं मला वाटत नाही. माझं हे मत आहे.
दुसरं म्हणजे ज्यांना वाटतंय, ते जातील तर त्याचे पुरावे द्यावेत. काही वेळा एखादं छोटंसं कुत्र्याचं पिल्लूही असतं. त्याला लाथ मारल्यानंतरही ते इथे – तिथे फिरून लोकांना डिस्टर्ब करत असतं…
अशा काही गोष्टी सोडल्यावर… एक महिन्यात काही झालं नाही.. ते सांगतात होणारे.. तर कधी होणार हे सांगावं त्यांनी.. उगाचच अशा प्रकारच्या अफवा पसरवणं काही योग्य नाही, अशी प्रतिक्रिया नीलम गोऱ्हे यांनी दिली.
दरम्यान, चर्चा काहीही असल्या तरी मिलिंद नार्वेकर सध्या तरी उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याच्या तयारीत बिझी असल्याचं दिसतंय.
शिवाजी पार्कवर त्यांनी काल रात्रीच संपूर्ण तयारीचा आढावा घेतला. त्यामुळे ते शिंदेगटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सध्या तरी अफवाच असल्याचं म्हटलं जातंय.
गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहणारे, अत्यंत विश्वासू आणि ठाकरेंचा राइट हँड अशी मिलिंद नार्वेकरांची ओळख आहे.
उद्धव ठाकरेंभोवतीच्या ज्या चौकडीमुळे सामान्य शिवसैनिक त्यांना भेटू शकत नाही, असे आरोप शिंदे गटातर्फे केले जातात, त्याच चौकडीतले महत्त्वाचे व्यक्ती म्हणजे नार्वेकर आहेत.
बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत निष्ठावान, त्यांच्यासाठी जेवण तयार करणारे चरणसिंह थापा यांचा शिंदे गटात प्रवेश झाल्यानंतर आता मिलिंद नार्वेकरांच्या नावाचीही काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु आहे.