Pahalgam Attack : कचाट्यात सापडणार तोच निसटले, पहलगामचे दहशतवादी 4 वेळा वाचले; काश्मीर खोऱ्यात नेमकं काय घडलं?
पहलगाम हल्ल्यामधील चार अतिरेक्यांचा काश्मीर खोऱ्यामधल्या जंगलामध्ये पाठलाग सुरू आहे. गेल्या पाच दिवसापासून चार वेळा अतिरेक्यांचा ठावठिकाणा लागलेला आहे. घनदाट जंगलामध्ये सुरक्षा दलाकडून अतिरेक्यांची शोधमोहीम सुरू आहे. पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या तीन आणि एका स्थानिक अतिरेक्याचा हात आहे.
पहलगाम हल्ल्यातील अतिरेक्यांचा काश्मीर खोऱ्यात पाठलाग सुरू आहे. सुरक्षा दलांना गेल्या पाच दिवसात अतिरेक्यांचा चार वेळा ठावठिकाणा लागलाय. पण घनदाट जंगलाचा फायदा घेत दहशतवाद्यांनी तिथून पळ काढलाय. पहलगाम हल्ल्यातल्या या अतिरेक्यांना काही स्थानिक काश्मिरी नागरिकांनी मदत केल्याचा संशय आहे. यातल्या 15 स्थानिकांची ओळख सुरक्षा दलांनी पटवली आहे. त्यातील तीन मुख्य संशयितांना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे. पहलगाममध्ये एकूण चार अतिरेक्यांनी हल्ला केला होता. त्यापैकी तीन अतिरेकी पाकिस्तानी तर एक अतिरेकी स्थानिक होता.
हल्ल्यात सहभागी असलेल्या स्थानिक अतिरेक्याचं नाव आदिल ठोकर असं आहे. याच आदिल ठोकरच घर भारतीय लष्कराने बॉम्बने उडवून दिलंय. चार दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये AK-47 आणि M 4 असॉल्ट रायफलने पर्यटकांवर गोळीबार केला होता. पहलगाममधल्या घटनास्थळावरून काडतूस देखील जप्त करण्यात आली आहेत. पहलगाममध्ये पहिल्यांदा दोन अतिरेक्यांनी गोळीबार केला. त्यावेळी इतर दोन अतिरेकी हॉटेलच्या मागच्या बाजूला दबा धरून बसले होते. दरम्यान, लोकल फोटोग्राफरने एक व्हिडिओ रेकॉर्ड केलाय. त्यावरून चार अतिरेक्यांची ओळख पटवण्यात यश आलंय. जंगलाच्या रस्त्याने 22 तास चालत हे अतिरेकी बैसरन व्हॅलीमध्ये आले होते. हल्ल्यानंतर अतिरेक्यांनी दोन पर्यटकांचे मोबाईल फोन देखील खेचून नेले असल्याची माहिती मिळतेय.