कोल्हापुरात पावसाची संततधार; पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राबाहेर
कोल्हापुरात देखील जोरदार पाऊस होताना दिसत आहे. जिल्हातील घाटमाथ्यावर होणाऱ्या मुसळधार पाऊसामुळे सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सोडला जात असल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढ झाली आहे.
कोल्हापूर, 20 जुलै 2023 | कोकण, मुंबई, विदर्भ, पालघर, रायगडमध्ये पावसाने गेल्या काही दिवसापासून जोर धरला आहे. त्यामुळे रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील शाळांना आज सुट्टी दिली आहे. तर येथील खालापूरच्या इर्शालगडावरील एका आदिवासी वाडीवर काळाने घाला घातला आहे. येथे वाडीवर रात्री दरड कोसळल्याने 60 ते 70 जण दरडीखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचदरम्यान कोल्हापुरात देखील जोरदार पाऊस होताना दिसत आहे. जिल्हातील घाटमाथ्यावर होणाऱ्या मुसळधार पाऊसामुळे सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सोडला जात असल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढ झाली आहे. मुसळधार पाऊस आणि राधानगरी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे पहिल्यांदाच पंचगंगा नदी पात्राबाहेर गेली आहे. पंचगंगेची पाणी पातळी 28 फूटांच्या बाहेर गेली असून सध्या नदीची वाटचाल ही इशारा तापळीकडे सुरू आहे. पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट तर धोका पातळी 42 फूट आहे.