पंढपुरात विठ्ठलाची पूजा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; व्हिडीओ व्हायरल, काय आहे प्रकरण?
VIDEO | पंढपुराच्या विठ्ठल मंदिरातील कार्यकारी अधिकारी आणि विठ्ठलाची पूजा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, काय आहे प्रकरण?
पंढरपूर, ३० जुलै २०२३ | पंढरपुरातील विठ्ठलाची पूजा आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतेच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी आपल्या मुलाकडून विठ्ठलाला अभिषेक घातला. कार्यकारी अधिकारी या पदाला विठ्ठलाची पूजा करण्याचा मंदिर समितीच्या ठरावानुसार अधिकार आहे. मात्र कार्यकारी अधिकारी यांच्या मुलाला थेट विठ्ठलाची पूजा करण्याचा आणि विठ्ठलास दुग्धाभिषेक घालण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्यामुळे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आता चर्चेच्या भवऱ्यात सापडले आहेत. विशेष म्हणजे सामान्य वारकऱ्यांना विठ्ठलाची पूजा करण्यासाठी 25 हजार रुपये हे नित्य पूजेला भरावे लागतात. पंचवीस हजाराची देणगी देऊन देखील लांबून विठ्ठलाची पूजा वारकऱ्यांना बघावी लागते. त्यामुळे सामान्य वारकऱ्यांना विठ्ठलाला दुग्धाभिषेक करण्यासाठी आता अधिकाऱ्याच्या पोटी जन्म घ्यावा लागेल का? असा सवाल वारकरी पाईक संघाच्या रामकृष्ण महाराज वीर यांनी उपस्थित केला आहे. पंचवीस हजार रुपये भरुन नित्य पूजा करणाऱ्या भाविकांनाही साहेबांच्या मुलाप्रमाणे विठ्लाला अभिषेक करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पाइक संघाचे अध्यक्ष वीर महाराज यांनी केली आहे. त्यामुळे निश्चितच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील पूजा आता पुन्हा चर्चेत सापडली आहे.