उद्धव ठाकरे यांच्या जंगी स्वागताच्या तयारीला पोलिसांचा ब्रेक, नेमकं कारण काय?
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेना फुटीनंतर हिंगोली दौऱ्यावर आहेत. त्यांची शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या मतदार संघात जाहीर सभा होणार आहे. त्यावर सध्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे.
नांदेड : 27 ऑगस्ट 2023 | माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता लोकसभा आणि विधानसभांच्या आगामी निवडणुकींकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. याचदृष्टीकोनातून त्यांनी मोर्चे बांधणीकरताना बंडखोर आमदारांच्या मतदार संघात आता सभा घेण्यास सुरूवात केली आहे. तर ते आज शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांच्या मतदार संघात जाहीर सभा घेणार आहेत.
ठाकरे यांची हिंगोलीत सभा होणार असल्याने सध्या हिंगोलीसह नांदेडमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर ठाकरे यांच्या स्वागतासाठी जागोजागी तयारी केली जात आहे. अशीच तयारी नांदेड येथे झाली असतानाच आता पोलीसांनी त्यांला परवानगी नाकारत ब्रेक लावला आहे. त्यामुळे शिवसैनिकांत नाराजी पसरली आहे. ठाकरे यांची हिंगोलीत जाहीर सभा होणार असल्याने ते नांदेड विमानतळावर येणार आहेत. तर येथून ते हिंगोली येथील जाहीर सभेसाठी जाणार आहेत.
यावेळी नांदेडमध्ये शिवसैनिकांनी त्यांच्या जंगी स्वागताची तयारी केली होत. 21 जेसीबीद्वारे विमानतळा बाहेर त्यांचे स्वागत करण्यात येणार होते. पण जेसीबीद्वारे स्वागताला पोलीसांनी परवानगी नाकारली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दडपनातूनच परवानगी नाकारल्याचा आरोप शिवसेनेने केलाय.