इंदापूर विधानसभेवरून महायुतीत वादाची ठिणगी? हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता तर पुत्र राजवर्धन यांच्याकडून मोर्चेबांधणी
लोकसभा निवडणुकांच्या आधीच इंदापूर विधानसभेच्या जागेवरून राजकारण रंगलं... इंदापूर विधानसभेच्या जागेवरून महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील आणि राजवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू.
मुंबई, १९ फेब्रुवारी २०२४ : लोकसभा निवडणुकांच्या आधीच इंदापूर विधानसभेच्या जागेवरून राजकारण रंगलं आहे. इंदापूरची जागा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील लढवणार असल्याचा दावा हर्षवर्धन पाटील यांचे पूत्र राजवर्धन पाटलांनी केलाय. त्यामुळे इंदापूर विधानसभेच्या जागेवरून महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील आणि राजवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, विधानसभेला जो आमचं काम करेल, त्याचंच काम लोकसभेला करणार असल्याचा इशारा अंकिता पाटील यांनी दिला. दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे दोघेही महायुतीत असल्यामुळे इंदापूरची जागा कोण लढवणार? हे अद्याप अस्पष्ट आहे. अशातच हर्षवर्धन पाटील यांचे पूत्र राजवर्धन पाटलांनी इंदापूर विधानसभेच्या जागेवर दावा सांगितलाय. २०१४ आणि २०१९ साली दत्तात्रय भरणे यांचा विजय झालाय तर दोन्ही वेळेत हर्षवर्धन पाटलांना पराभव पत्कारावा लागला.