संजय गायकवाड यांच्या ‘त्या’ टीकेवर प्रियंका चतुर्वेदी यांचा पलटवार; म्हणाल्या, ‘चार दिन की चाँदणी फिर…’
VIDEO | एकनाथ शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी केली इंडिया आघाडीच्या नेत्यांवर आणि बैठकीवर खोचक टीका, या टीकेवर ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी नेमकं काय दिलं प्रत्युत्तर?
मुंबई, १ सप्टेंबर २०२३ | मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक होतेय. या बैठकीला देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली आहे. या बैठकीवर शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. अशातच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीही या इंडिया आघाडीच्या बैठकीवर निशाणा साधला आहे. ‘असे कितीही विरोधी पक्ष नेते एकत्र आले तरी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सामना करू शकत नाही. हे मनाने हरलेले आणि शरीरानेही थकलेले आहेत. ते किती दिवस टिकणार’, असे म्हणत संजय गायकवाड यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांवर खोचक टीका केली आहे. या टीकेवर ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, ‘टीका करण्याची ही कोणती भाषा आहे. मीच त्यांना प्रश्न विचारते त्यांचं करिअर किती दिवसांचं आहे? चार दिन की चांदणी फिर काली रात, ५० खोके घेऊन तुम्ही समाधानी असाल पण देशाची जनता तुम्हाला बघत आहे’, असे म्हणत पलटवार त्यांनी केला आहे.