पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं पुन्हा आंदोलन; सरकारच्या विरोधात उपोषण करणार
MPSC Student Protest : एमपीएससीच्या विद्यार्थी पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे.आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोवर उपोषण चालूच ठेवणार, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
पुणे : पुण्यात उद्या पुन्हा एकदा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन होणार आहे. एमपीएससी तांत्रिक विभागाच्या परीक्षेचा पॅटर्न 2025 पासून लागू करावा, या मागणीसाठी उद्यापासून विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत. पुण्यातील बालगंधर्व चौकात विद्यार्थी उपोषणाला बसणार आहेत. याआधी सरकारने केवळ राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पॅटर्न 2025 पासून लागू केला आहे. मात्र तांत्रिक परीक्षांचा विचार सरकारकडून केला गेला नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. आपल्या या मागणीसाठी विद्यार्थी पुन्हा एकदा उद्या पुण्यात आंदोलनाला बसणार आहेत. या आंदोलनासाठी राज्यभरातून विद्यार्थी उद्या पुण्यात येणार आहेत. “सरकार जाणून बुजून आम्हाला त्रास देत आहे. सरकारने ताट वाढलं पण ते रिकामे ठेवलंय. त्यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार आहे”, असा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला आहे.