Pune : भिसेंच्या ‘त्या’ बाळांचं पालकत्व घ्यावं, भाजप आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मोठी मागणी
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर मंगेशकर रूग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवती महिलेचा जीव गेल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबियांकडून केला जात आहे. अशातच आता पुण्यातील आमदार अमित गोरखे यांनी याबद्दल एक मोठी मागणी केली आहे.
मंगेशकर कुटुंबीयांनी सामाजिक भान ठेवत मृत्यू झालेल्या गर्भवती महिलेच्या दोन्हीही बालकांचे पालकत्व 18 वर्षापर्यंत स्वीकारावं, अशी मोठी मागणी पुण्यातील भाजप आमदार अमित गोरखे यांनी केली. ते पुढे असेही म्हणाले, धर्मादाय आयुक्त आणि यमुना जाधव यांच्या एकत्रित समितीचा अहवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे तो अहवाल थेट फडणवीसांकडे गेल्याने तो पाहता आला नाही. मात्र माता मृत्यू अहवाल अद्याप येणं बाकी असून तो अहवाल आज येण्याची शक्यता आहे. हे येणारे सगळे अहवाल हे भिसे कुटुंबियांच्या बाजूने असतील, असे अमित गोरखे यांनी सांगितले. तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या प्रकरणात चूक ही डॉ. घैसासांची होती त्यामुळे त्यांनी राजीनामा देखील दिला. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी अमित गोरखे यांनी केली. दरम्यान, अशा कुठल्याही प्रकारची घटना घडली तर त्याला ती संस्था आणि व्यवस्थापन जबाबदार असतं. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तात्काळ चौकशी समिती स्थापन केली आणि लवकरच यावर योग्य तो निर्णय येईल आणि तो निपक्षपाती असेल, अशा विश्वासही अमित गोरखे यांनी व्यक्त केला.