‘साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण…’, राधाकृष्ण विखे पाटलांचं मुलाच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण
साई संस्थानच्या भोजनालयातील मोफत जेवण बंद करा… असे म्हणत माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी साई संस्थान प्रशासनाकडे मागणी केली आहे. यावर काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील?
साई संस्थानच्या भोजनालयातील मोफत जेवण बंद करा, अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी साई संस्थान प्रशासनाकडे मागणी केली. पुढे ते असेही म्हणाले, जे पैसे अन्नदानात जातात त्या पैशांचा वापर आमच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करावा, अख्खा देश इथे येऊन फुकट जेवण करतोय, महाराष्ट्रातील सगळे भिकारी इथे गोळा झालेत.. हे योग्य नाही. आम्हाला आंदोलनाची वेळ आली तरी चालेल आम्ही आंदोलन करू’, असं वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केलं. यावर साई भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, सुजय विखे यांनी मोफत भोजन बंद करण्याची मागणी केली असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावर भाष्य केले आहे. राधाकृष्ण विखे यांनी मोफत जेवण सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ‘साईभक्तांना प्रसाद भोजन निःशुल्क सुरूच राहील. मात्र सुजय विखेंच्या वक्तव्याचा विपर्यास केला. शिर्डीत भिक्षेकऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे. त्या अनुषंगाने सुजयचे वक्तव्य आहे’, असे विखे पाटील म्हणाले.