Ravindra Dhangekar : शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसचा ‘पंजा’ काही सुटेना…
जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेत आलेले काँग्रसेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. मात्र या पोस्टवर काँग्रेसचा पंजा दिसत असल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. २०२३ मध्ये झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी भाजपाच्या बालेकिल्ल्यात सध्याचे आमदार हेमंत रासने यांचा पराभवाची धूळ चारली होती. त्यानंतर त्यांची एकच चर्चा होती. मात्र, गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत धंगेकरांचा दारूण पराभव झाला. त्यानंतर त्यांनी शिंदेंचा धनुष्यबाण हाती घेतली. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही रवींद्र धंगेकर यांच्या मनातून काँग्रेस पक्ष जात नाहीये अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. कारण तसं धंगेकरांच्या सोशल मीडियावर पोस्टवरून समोर आलं आहे. जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी धंगेकरांच्या सोशल मीडियावर एका पोस्टवर काँग्रेसचा पंजा दिसतोय. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसचा ‘पंजा’ काही सुटेना…असी चर्चा सुरू झाली आहे.