पेट्रोल चालकांचा नवा फंडा!, हातात असेल 2 हजारांची नोट तर किमान इतक्या रुपयांचे पेट्रोल टाकावं लागणार?
आरबीआयने इतर बँकांना 2 हजार रुपयांच्या नोटा जारी करणे थांबवा, असा सल्लाही दिला आहे. इथून पुढे 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद होणार आहे. या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करून बदलून घेता येतील, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.
नाशिक : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेताना 2000 रुपयांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आरबीआयने इतर बँकांना 2 हजार रुपयांच्या नोटा जारी करणे थांबवा, असा सल्लाही दिला आहे. इथून पुढे 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद होणार आहे. या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करून बदलून घेता येतील, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. त्यानंतर मात्र आता अनेक ठिकाणी पळापळ सुरू असल्याचे दिसत आहे. तर अनेक सामान्यांकडे ज्या नोटा आहेत त्या सोनं खरेदी करून अथवा इतर मार्गांनी खपवण्याचं काम सुरू आहे. तर अनेक ठिकाणी लोक पेट्रोल भरण्यासाठी 2 हजार रुपयांची नोट घेऊन बाहेर पडले आहेत. नाशिकमध्ये देखील असेच चित्र असून त्यामुळे पेट्रोल पंप चालक देखील त्रस्त झाले आहे. केवळ पन्नास आणि शंभर रुपयांची इंधन खरेदी केल्यानंतर सुट्टे पैसे नागरिकांना देण्यासाठी उपलब्ध नसल्याने मोठी समस्या निर्माण होत असल्याचे पेट्रोल पंप चालक-मालक यांनी सांगितले. किमान हजार रुपयांचे पेट्रोल टाकले तरच दोन हजार रुपयांची नोट स्वीकारली जाईल, अशी भूमिका देखील घेण्यात आली आहे.