मुंबईत आमदारालाच घातला गंडा, 25 लाखांची चोरी अन् 30 लाखांच्या खंडणीचीही मागणी
VIDEO | चालकाने मित्राच्या मदतीने 25 लाख रुपये चोरून मुंबईत आमदारालाच लुटलं, कुठं घडला प्रकार?
मुंबई : नांदेडचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या मुंबईतील राहत्या घरात चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या चोरट्यांनी आमदाराच्या घरातून तब्बल २५ लाख रूपयांची रोकड लंपास केली असून त्याला लुटलं आहे. इतकंच नाही तर चोरट्यांनी त्यांच्याकडे ३० लाखांची खंडणी देखील मागितल्याची माहिती मिळतेय. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आमदाराच्या चालकाने त्याच्या मित्राच्या मदतीने ही चोरी केली आहे. या प्रकरणी एनएम जोशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. नांदेडमधील लोहा-कंधार मतदारसंघाचे श्यामसुंदर शिंदे हे आमदार आहेत. मविआचं सरकार स्थापन होत असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मविआमध्ये प्रवेश केला. अडीच वर्ष मविआ सोबत संसार थाटल्यानंतर त्यांनी सोडचिठ्ठी देत भाजप सोबत घरोबा केल्याचे पाहायला मिळाले होते.