बीडमध्ये हिंसक वातावरण, आंदोलकांची जाळपोळ अन् मस्साजोग गावाला मनोज जरांगे पाटलांची भेट
संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी आज संपूर्ण मस्साजोग गावच्या ग्रामस्थांनी बीड-लातूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करत रस्ता रोखून ठरला, यामुळे या महामार्गावरील वाहतूकही बऱ्याच वेळापासून ठप्प होती.
बीडमधील संतोष देशमुख हत्येप्रकरणी रास्तोरोको आंदोलन करण्यात आलं आहे. बीडमधील मस्साजोग गावातील संतोष देशमुख यांचं काल अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आल्याचे समोर येत आहे. तर आज त्यांचा मृतदेह आढळला असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी आज संपूर्ण मस्साजोग गावच्या ग्रामस्थांनी बीड-लातूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करत रस्ता रोखून धरला, यामुळे या महामार्गावरील वाहतूकही बऱ्याच वेळापासून ठप्प होती. याप्रकरणी संतप्त आंदोलकांकडून आंदोलनाला हिंसक वळण लागल्याची माहिती आहे. केजमध्ये पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आले असून आंदोलकांकडून देशमुख यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ आज सकाळपासून रास्ता रोको सुरु करण्यात आला आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे मस्साजोग परिसरात तणाव वाढला आहे. अशातच मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोग गावाला भेट दिली. त्यांनी रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची भेट घेतली.