Palghar | मच्छीमारांनी जाळं टाकलं, 157 घोळ मासे हाती लागल्यानं नशीब पालटलं, सव्वा कोटींची कमाई
मुरबे येथील हरबा देवी ही मासेमारी बोट वाढवणच्या समोर समुद्रात मासेमारीला गेली असता त्यांच्या जाळ्यात 157 घोळ मासे सापडले.त्या माश्याचे मांस आणि त्याच्या पोटातील भोत(ब्लेडर) ह्याची विक्रीतून त्या मच्छिमार ग्रुपला सुमारे 1कोटी 25 लाखाची रक्कम मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
मुरबे येथील चंद्रकांत तरे आणि त्याचे सहकारी असलेल्या अन्य आठ सहकाऱ्यांसह 28 ऑगस्ट रोजी आपली बोट मासेमारीसाठी घेऊन रवाना झाले. डहाणू-वाढवण च्या समोर समुद्रात साधारणपणे 20 ते 25 नॉटिकल समुद्रात हरबा देवी बोटीतून समुद्रात जाळी टाकण्यात आली.वागरा पद्धतीची जाळी समुद्रात सोडल्यावर काही तासाच्या प्रतिक्षे नंतर बोटीतील मच्छीमारांनी समुद्रात सोडलेली आपली जाळी बोटीत घेण्यास सुरुवात केली.त्या जाळ्या मध्ये एकूण 157 घोळ आणि दाढे मासे सापडल्याने त्याचे नशीब फळफळले.
सुमारे 12 किलो ते 25 किलो वजनाचे हे घोळ मासे सापडल्याने सर्व मच्छिमार आनंदात होते.घोळ माश्याच्या पोटात असलेल्या भोत ह्याला मोठी किंमत असून नर(मेल) जातीच्या भोताला व्यापाऱ्यांकडून मोठी किंमत मिळत असते.त्या तुलनेत मादी(फिमेल)जातीच्या माश्याच्या भोत ला अगदीच नगण्य किंमत मिळते.उत्तर प्रदेश,बिहार येथून आलेल्या परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून या भोताची खरेदी केली जाते. या विशिष्ट जातीच्या व्यापाऱ्यांची व्यवसायात मक्तेदारी असून लिलावा द्वारे या भोताची खरेदी केली जाते.सर्वात जास्त बोली लावणारा आणि पैश्याची हमी देणाऱ्या व्यापाऱ्यांची निवड विक्री दरम्यान केली जाते.