चार खांद्यावरून नेताना आम्हीही… जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर अमोल कोल्हे यांचं प्रभू श्रीरामावर भाष्य
'राम राम म्हणून आम्हाला जोडणारा देश हवाय, असं शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले, प्रभू श्रीरामाविषयी जेव्हा आम्हाला शिकवलं जातं, तेव्हा एकवचनी, एकबाणी, एकपत्नी असल्याचे सांगितले जाते. तिसऱ्या विषयावर मी जाहीर बोलणार नाही,' अमोल कोल्हेंचं शिबीरातून रामावर भाष्य
शिर्डी, ४ जानेवारी २०२४ : प्रभू श्रीरामचंद्र जेवढे तुमचे आहेत, तेवढेच आमचे आहेत. चार खांद्यावरून नेताना आम्हीही ‘जय राम श्री राम, जय जय राम’ म्हणतो. पण आमच्या मंदिरात असणारे श्रीरामचंद्र हे धनुष्यबाण ताणलेले नाहीत तर ते आशीर्वादाचा हात उंचावलेले, माता सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमान यांच्यासह कुटुंबवत्सल प्रभू श्रीरामचंद्र आहेत. आम्ही माणसाला माणूस भेटला की राम राम म्हणतो. राम राम म्हटल्याने माणूस जोडला जातो. राम राम म्हणून आम्हाला जोडणारा देश हवाय, असं शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले, प्रभू श्रीरामाविषयी जेव्हा आम्हाला शिकवलं जातं, तेव्हा एकवचनी, एकबाणी, एकपत्नी असल्याचे सांगितले जाते. तिसऱ्या विषयावर मी जाहीर बोलणार नाही, असं वक्तव्य करत अमोल कोल्हे यांनी नाव न घेता विरोधकांवर हल्लाबोल केला. तर निवडणुकीच्या आधी वचनं द्यायची आणि मग ‘चुनावी जुमला’ असल्याचं सांगून टाळायचं, अशांना प्रभू श्रीराम कसे पावतील? असा सवाल करत अमोल कोल्हे यांनी विरोधकांवर खोचक टीकाही केली आहे. ते शिर्डीतील शरद पवार गटाच्या शिबीरात बोलत होते.