श्रीमंत संजय राऊत यांचं स्वागत… शिवसेनेची तीन दिवसांची दिवाळी, मुंबईतला माहौल काय?
मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात शिवसैनिकांनी रात्रीतूनच फटाके आणि आतिषबाजी करत संजय राऊतांचं स्वागत केलंय.
गिरीश गायकवाड, मुंबईः शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची काल जामीनावर सुटका झाल्यानंतर ठाकरे (Thackeray) गटाच्या शिवसेनेतर्फे मोठा जल्लोष साजरा करण्यात येतोय. पुढचे काही दिवस याच आनंदात मुंबई दणाणून सोडण्याचा निश्चय शिवसेनेने (Shivsena) केलेला दिसतोय. श्रीमंत संजय राऊत यांचं स्वागत… असे भले मोठे बॅनर्स आज मुंबईत लावण्यात आले आहेत. पुढचे तीन दिवस मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे दिवाळी साजरी करण्यात येणार आहे.
संजय राऊत यांच्या स्वागतासाठी मुंबईत ठिकठिकाणी बॅनरबाजी पहायला मिळतेय. कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला… हा मजकूर त्यावर लिहिण्यात आलाय. वाघाच्या फोटोसमोर आक्रमकपणे इशारा करणारा संजय राऊत यांचा फोटो असे बॅनर्स या परिसरात लावण्यात आले आहेत.
संजय राऊत सध्या भांडूप येथील त्यांच्या मैत्री या निवासस्थानी आहेत. काही वेळानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलणार आहेत. त्यांची प्रकृती ठिक नाही. त्यामुळे त्यांचे फॅमिली डॉक्टरदेखील भेटीसाठी येण्याची शक्यता आहे.
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. सोमवारी त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली. जवळपास १०२ दिवस संजय राऊत तुरुंगात होते.
शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत हे जेलमधून बाहेर आल्यामुळे शिवसेनेत प्राण आल्याची भावना शिवसैनिकांमध्ये आहे. मातोश्रीचा परिसरदेखील संजय राऊत यांच्या स्वागताच्या बॅनर्सनी फुललाय.
भांडुप येथील एका ब्रिजवर डिजिटल फ्लेक्सवरदेखील संजय राऊतांच्या स्वागत अत्यंत वेगळ्या पद्धतीने करण्यात येतेय. तर काल मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात शिवसैनिकांनी रात्रीतूनच फटाके आणि आतिषबाजी करत संजय राऊतांचं स्वागत केलं.