संजय राऊत डायरेक्टर असणारा इव्हेंट महाराष्ट्राला पहायला मिळणार, ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर शिवसेना नेत्याची टीका
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलेल्या आमदार अपात्रतेच्या निकालावर उद्धव ठाकरे आज सविस्तरपणे आपली भूमिका मांडणार असल्याचे सांगितले जात आहे. या पत्रकार परिषदेवरूनच शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी जोरदार टीका केली आहे.
मुंबई, १६ जानेवारी २०२४ : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरील निकालानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज महापत्रकार परिषद होत आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलेल्या आमदार अपात्रतेच्या निकालावर उद्धव ठाकरे आज सविस्तरपणे आपली भूमिका मांडणार असल्याचे सांगितले जात आहे. या पत्रकार परिषदेवरूनच शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राला कधीही न घडलेला इव्हेंट आज पहायला मिळेल. त्यांचे डायरेक्टर संजय राऊत आहेत, असे म्हणत शिरसाट यांनी खोचक टीका केली आहे. तर पुढे ते असेही म्हणाले की, मेरी आवाज सुनो पार्ट 2 तिथे पहायला मिळेल. हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणतात की ते का नाही अशी प्रत्रकार परिषद घेत? त्यांना बोलयचा अधिकार नाही. यांचं म्हणजे हम करे सो कायदा आहे. आजच्या पत्रकार परिषदेचा एपिसोड आणि काय घोषणा आहेत ते पण ठरलेलं आहे. तर कलायमॅक्स असा असेल की आम्ही जनतेच्या न्यायालयात जाणार, असे म्हणत त्यांनी खोचक टोलाही लगावला आहे.