Special Report | माफी मागावी, असं Raj Thackeray बोललेत काय? इतर राज्यांच्या विरोधाचं काय?-tv9
खरोखर राज ठाकरेंनी मुंबईतल्या लोंढ्यावरुन सर्व यूपी-बिहारींना दोषी धरलं होतं का? त्यावरुन माफी मागण्याची मागणी तर्काला धरुन आहे का? आणि याआधी चिथावणीची भाषा फक्त राज ठाकरेच करत होते, की मग उत्तर भारतीय नेतेही तसंच बोलत होते, हे प्रश्नही समजून घ्यावे लागतील.
5 दिवसांपासून भाजप खासदार बृजभूषण माफीच्या मागणीवर अडून बसलेयत. पण राज ठाकरेंनी माफी मागावी, असं ते नेमकं काय बोललेयत?. खरोखर राज ठाकरेंनी मुंबईतल्या लोंढ्यावरुन सर्व यूपी-बिहारींना दोषी धरलं होतं का? त्यावरुन माफी मागण्याची मागणी तर्काला धरुन आहे का? आणि याआधी चिथावणीची भाषा फक्त राज ठाकरेच करत होते, की मग उत्तर भारतीय नेतेही तसंच बोलत होते, हे प्रश्नही समजून घ्यावे लागतील. सर्वात आधी राज ठाकरेंनी मुंबईत अनधिकृतपणे राहणाऱ्या लोकांचा मुद्दा उचलला. त्यावर उत्तर भारतातल्या नेत्यांनी थेट ठाकरेंनाच घुसखोर म्हटलं. नंतर मग या वादाला अनेक फाटे फुटले. त्यानंतर राज ठाकरेंनी रेल्वे भरती परीक्षांच्या मनमानी कारभाराचा मुद्दा उचलला. त्यावेळी मनसैनिकांनी कायदा हातात घेऊन उत्तर भारतीयांना मारहाण केली. हे खरं असलं तरी या आंदोलनानंतर रेल्वे भरती परीक्षा पद्धतीत अनेक मोठे बदल झाले.
दुसरा मुद्दा होता तो म्हणजे दुसऱ्या राज्यात कामासाठी जाताना नोंदणी करण्याचा. तो कायदा आधीपासूनच होता., मात्र त्याची अंमलबजावणी होत नव्हती. राज ठाकरेंनी या नोंदणीवरुन इशारा दिला. काही काळ नोंदणी सुरु झाली, पण पुन्हा ते बासनात गुंडाळलं गेलं. हा मुद्दा थेट 10 वर्षांनी म्हणजे 2020 च्या लॉकडाऊनमध्ये चर्चेत आला. लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात यूपी-बिहारी मुंबई सोडून गेले. लॉकडाऊन संपल्यानंतर योगी आदित्यनाथांनी एक विधान केलं की यापुढे यूपीचे कामगार हवे असतील, तर महाराष्ट्राला उत्तर प्रदेश सरकारची परवानगी घ्यावी लागेल., तेव्हा राज ठाकरेंनी त्याला उत्तर म्हणून आता महाराष्ट्रात येण्यासाठी तुमच्याच कामगारांना परवानगी घ्यावी लागेल, असं उत्तर दिलं.
2012 च्या दरम्यान महाराष्ट्रातल्या गुन्हेगारीवरुन राज ठाकरेंनी परप्रांतियाचा मुद्दा लावून धरला. पण त्यासाठी त्यांनी पोलिसांनी दिलेली आकडेवारी आणि माहिती सुद्धा समोर ठेवली. मात्र तेव्हापासून राज ठाकरे थेट यूपी-बिहारींना गुन्हेगार म्हटल्याचं बोललं गेलं. खासकरुन हिंदी माध्यमांनी त्यावरुन बराच खल माजवला. मुंबईत राहून उत्तर प्रदेशचे ब्रँड अॅम्बेसेडर झाल्यामुळे बच्चन कुटुंबियांवर राज ठाकरेनी टीकास्र डागलं. नंतर मात्र जेव्हा उत्तर भारतीयांच्या मंचावर राज ठाकरे गेले, तेव्हा काही गोष्टींवर मी ठाम आहे., आणि काही गोष्टी झाल्या-गेल्या गंगेला मिळाल्या, असं राज ठाकरे म्हटले. महत्वाचा योगायोग म्हणजे बरोब्बर १२ वर्षांपूर्वी आत्तासारखीच स्थिती नितीश कुमारांवर ओढावली होती. त्याकाळीही नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री होते, मुंबईत साजऱ्या होणाऱ्या बिहार दिनाला नितीश कुमार प्रमुख पाहुणे होते. मात्र तेव्हा राज ठाकरेंनी बृजभूषण यांच्याप्रमाणेच नितीश कुमारांना मुंबईत पाय न ठेवू देण्याची धमकी दिली होती.
प्रक्षोभकं भाषणं समुहाबद्दलच्या विधानांमुळे तेव्हा सुद्धा राज ठाकरेंवर गुन्हे दाखल झाले होते. पण त्यावेळी इतर राज्यातले मंत्री आणि नेते यूपी-बिहारबद्दल काय बोलले, याचीही उदाहरणं राज ठाकरेंनी दिली होती. त्यामुळे आता त्या नेत्यांकडे आणि त्यांच्या पक्षाकडेही माफीची मागणी करणार का, असा प्रश्न बृजभूषण सिंहांनाही विचारला जातोय. याआधीचे आरोप किंवा दाव्यांवेळी राज ठाकरे अनेकदा वर्तमानपत्रांची कात्रणं, अहवाल किंवा तत्सम पुरावे लोकांपुढे ठेवायचे. मात्र मुंबईतल्या सभेत त्यांनी पहिल्यांदा आपल्या कानावर आल्याचं सांगून उत्तर प्रदेशचा विकास होत असल्याचं म्हटलं. जेव्हा राज ठाकरे सर्वात आधी यूपी-बिहारचा विकास करा म्हणून म्हणत होते, तेव्हा एकही उत्तर भारतीय नेता मनसेला तोडीस-तोड उत्तर देण्यात कचरत होता. आणि जेव्हा आज राज ठाकरे उत्तर प्रदेशचा विकास होत असल्याचं म्हणतायत, तेव्हा राज ठाकरेंविरोधात इशाऱ्यांवर इशाऱ्यांची मालिका सुरु झालीय.