Sushma Andhare Video : ‘… हे यूज टू झालंय’, देवेंद्र फडणवीस अन् राज ठाकरेंच्या भेटीवरून सुषमा अंधारेंची खोचक टीका
देवेंद्र फडणवीसांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच ते राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागलं होतं. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये साधारण तासभर बंद दाराआड चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. या भेटीनंतर मनसे-भाजप युती होणार का? अशा चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, ‘ही कुठलीही राजकीय भेट नव्हती. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंचा मला अभिनंदनाचा फोन आला होता, त्यावेळेस मी घरी येईन, असं म्हटलं होतं. त्यामुळेच आज भेट घेतली’, देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हणत होणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला. मात्र यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली. ‘राज ठाकरे यांचा पॉलिटिकल रिलेव्हन्स संपत चाललेला आहे. त्यामुळे राज ठाकरे काय बोलतात आणि त्यांच्याकडे कोण जातं यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात फार काही उलथापालथ होणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेलाच काय पण मनसेच्या पदाधिकाऱ्यांनादेखील ही गोष्ट यूज टू झालेली आहे. राज ठाकरे हे भाजपाच्या विरोधात बोलतात. मात्र निवडणुका जवळ आल्या की ते प्रो भाजप होतात.’, असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर खोचक टीका केली. तर राज ठाकरे यांना कोणीही इतकं सीरियसली घेत नाही. राज ठाकरे हे वैचारिक अधिष्ठान नसणारे आणि सतत भूमिका बदलणारे आहेत. त्यामुळे ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आले काय किंवा राज ठाकरे त्यांच्याकडे गेले काय हे यू ज टू झालं आहे, असा घणाघात सुषमा अंधारे यांनी केला.