‘आज विनायक मेटे असते तर भाजपकडून…’, शिवसंग्रामच्या तानाजी शिंदे यांनी काय व्यक्त केली खंत?
VIDEO | 'जर त्यांना आमची गरज वाटत नसेल आणि अशीच वागणूक मिळत असेल तर आम्ही आमचा निर्णय घ्यायला मोकळे आहोत', शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष तानाजी शिंदे यांनी स्पष्टपणे नाव न घेताच सांगितलं
मुंबई, १ सप्टेंबर २०२३ | गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत महायुतीची घटकपक्षांसोबत बैठक होतेय. मात्र या बैठकीला शिवसंग्राम पक्षाला आमंत्रण दिलं नसल्याने या पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. यावर शिवसंग्रामचे अध्यक्ष तानाजीराव शिंदे भाष्य केले आहे. ‘आम्हाला बैठकीला बोलवले नाही यांची खंत आहे आणि ती स्वाभाविकच आहे. गेल्यावेळी भाजपाने जी घटक पक्षांची बैठक मुंबईत बोलवली होती. त्यात आम्ही मराठा आरक्षण आणि शिवस्मारकाबाबतची भुमिका मांडली होती. कदाचित आमच्या भुमिकेचे उत्तर देणे, आमची प्रश्न त्यांना अडचणीचे वाटत असावे. म्हणूनच आम्हाला दिल्ली येथे झालेल्या बैठकीला बोलवले नाही आणि आजही होत असलेल्या बैठकीला बोलवले नसावे. सध्याच्या परिस्थितीत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र खंत वाटते की विनायकराव मेटे असते तर अशी वागणूक मिळाली नसती’, असे म्हणत तानाजीराव शिंदे यांनी खंत व्यक्त केली. ते पुढे असेही म्हणाले की, आमचे मुद्दे भाजपाला आधी पटायचे त्यामुळे त्यांनी आम्हाला सोबत घेतले. २०१४ पासून आम्ही त्यांच्या सोबत आहे. आमचे मुद्दे काही नवीन नाही. याला दुर्लक्ष करुन चालणार नाही. जर त्यांना आमची गरज वाटत नसेल आणि अशीच वागणूक मिळत असेल तर आम्ही आमचा निर्णय घ्यायला मोकळे आहोत, असं स्पष्ट मत तानाजीराव शिंदे यांनी म्हटलंय.