खरा धोका त्र्यंबकेश्वराला धूप दाखविणाऱ्यांपासून नाही तर…, ‘सामना’तून भाजपवर जोरदार हल्लाबोल
VIDEO | भाजपचं हिंदुत्व हे गोमूत्रधारीचं, सामनाच्या अग्रलेखातून काय केली सडकून टीका?
मुंबई : नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर धर्मियांच्या काही तरूणांनी जबरदस्तीने शिरण्याचा प्रयत्न केल्याचं प्रकरण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाकडून भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. अशातच आजच्या दैनिक सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणी भाजप आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळत आहे. त्र्यंबकेश्वरातील गोमुत्रधारी हिंदुत्वाचे उपठेकेदार आहेत. खरं तर हिंदुत्वाला खरा धोका त्र्यंबकेश्वराला धूप दाखविणाऱ्यांपासून नसून गोमूत्राने शुद्धीचे शिंपण करणाऱ्यांपासून आहे. आता म्हणे गृहमंत्री फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वरातील धूप-महाआरती प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथकाची घोषणा केली. जे त्र्यंबकेश्वरमध्ये घडलेच नाही त्याची चौकशी? असा सवाल सामनातील अग्रलेखातून विचारण्यात आला आहे तर हा सगळा उफराटा प्रकार आहे आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी उतावीळपणे तो करावा हे अधिक गंभीर आहे. मुळात चौकशी करायचीच असेल तार गोमूत्राचे बॅरल घेऊन त्र्यंबकेश्वरात हैदोस घालणाऱ्या हिंदुत्वाच्या उपठेकेदारांची करा. महाराष्ट्राच्या सामाजिक सलोख्याला चूड लावण्याचे उपकंत्राट त्यांना नक्की कोणी दिले? असा सवाल करत भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.