कारसेवकांचे रक्त सांडणाऱ्यांचा सन्मान अन् बाळासाहेब ठाकरे, सावरकरांचा विसर; ‘सामना’तून भाजपवर हल्ला
'स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदुहृदय सम्राटांना पुरस्कार देण्यास मोदी सरकारला विसर'
समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते मुलायम सिंह यादव यांना मोदी सरकारने पद्मविभूषण पुरस्कार दिला आहे. त्यावरून दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भाजप, केंद्र सरकारवर चांगलाच निशाणा साधण्यात आला आहे. ज्यावेळी मुलायम सिंह यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदुहृदय सम्राटांना पुरस्कार देण्यात आला नसल्याने मोदी सरकारला या दोघांचा विसर पडल्याची टीका करण्यात येत आहे. तर वीर सावरकरांना पुरस्कार देण्यापासून मोदी सरकारला कोणी रोखले होते, असा सवाल ही सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अनेकांना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. यातील अनेक नावे संघ परिवाराशी संबंधित आहेत. त्याबद्दल आक्षेप घेण्याचे कारण नाही. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या रमेश पतंगे, भिकुजी इदाते यांचा सन्मान योग्यच आहे, असे सामनात म्हटले आहे. तर मुलायम सिंह यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला, हे अक्रितच म्हणावे लागेल. जिवंतपणी कारसेवकांचे हत्याके म्हणून त्यांची अवहेलना भाजपने केली. त्यांना मौलाना मुलायम म्हणून हिणवलं, त्याच मुलायम सिंह यादव यांना भाजपने सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला. प्रखर हिंदुत्ववादी मोदी सरकारने दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मुलायमसिंह यादव यांना दिला, असे म्हणत भाजपावर हल्लाबोल करण्यात आला आहे.