Sambhaji Nagar : पर्यटनाच्या राजधानीतच पर्यटक असुरक्षित, अजिंठा-वेरूळ लेण्या बघायला जाताय? जरा जपून, कराण…
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणाऱ्या अंजिठा, वेरूळ या लेण्यांमध्ये बऱ्याचदा मधमाशांचे पोळे पाहायला मिळाले आहे. अंजिठा, वेरूळ या लेण्या बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक जात असतात मात्र त्यांच्यावर वारंवार मधमाशांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्याचे समोर आले आहे.
पर्यटनाची राजधानी म्हणून ओळख असणारा छत्रपती संभाजीनगर जिल्हा पर्यटकांसाठी असुरक्षित असल्याचे वास्तव समोर आले आहे. काल संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्याच्या परिसरात आग लागल्याचा प्रकार पाहायला मिळाले. या घटनेमुळे काल दिवसभर पर्यटकांना त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागला होता. तर आज याच पर्यटनाच्या राजधानीतून एक बातमी समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच असणाऱ्या वेरुळ आणि अजिंठा लेण्यांमध्ये पर्यटकांवर मधमाशांचा मोठ्या प्रमाणात हल्ला झाला. पर्यटकांवर होणाऱ्या मधमाशांच्या हल्ल्यामुळे पर्यटक हैराण झाले आहेत. मात्र अशा घटनेनंतर पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या मधमाशांचे पोळे अद्याप तसेच असून ते हटवण्यात आले नाही. अशा घटनांमुळे पर्यटनाची राजधानी अडचणीत आली आहे, असेच म्हणावे लागेल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणाऱ्या अंजिठा, वेरूळ, दौलताबाद, बीबी का मकबरा यासारखे मोठे पर्यटक स्थळ आहेत. या ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना आता मोठ्या अडचणी आणि समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे दिसतेय.