राम मंदिरात राष्ट्रपतींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा व्हावी- उद्धव ठाकरे

राम मंदिरात राष्ट्रपतींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा व्हावी- उद्धव ठाकरे

| Updated on: Jan 13, 2024 | 12:40 PM

मातोश्रीवर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरात राष्ट्रपतींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा व्हावी, अशी मागणी केली. त्याचप्रमाणे येत्या 22 जानेवारी रोजी नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आणि आरती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाचं आमंत्रण त्यांनी राष्ट्रपतींनाही दिलं आहे.

मुंबई : 13 जानेवारी 2024 | “राम मंदिर उभारणं हे माझ्या वडिलांचंही स्वप्न होतं. आज मंदिर बांधलं जात आहे. हा माझ्यासोबतच लाखो लोकांसाठी आनंदाचा क्षण आहे. 22 जानेवारीला आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊ. त्यानंतर संध्याकाळी गोदावरी नदीवर आम्ही आरती करू. यावेळी काळाराम मंदिरात पूजेसाठी आम्ही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि शंकराचार्य यांनाही आमंत्रित केलंय,” असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय.

यावेळी त्यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या मुद्द्यावरून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टोला लगावला. “भाजप या मुद्द्याचा राजकीय किंवा व्यावसायिक हेतूसाठी वापर करत आहे की नाही हे माहित नाही. पण मी देशभक्त आहे अंधभक्त नाही. राम मंदिरासाठी शिवसेनेचं योगदान सर्वांना माहिती आहे. येत्या 22 जानेवारीला देशभरात दिवाळी साजरी झालीच पाहिजे. पण देशांचं जे दिवाळं निघालं आहे त्याचं काय तेसुद्धा पाहा. यावर चाय पे चर्चा करा, ढोकळ्यावर चर्चा करा.. पण चर्चा करा असा,” असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. त्याप्रमाणे 22 तारखेला अयोध्येतील राम मंदिरात राष्ट्रपतींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा व्हावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

Published on: Jan 13, 2024 12:38 PM