उद्धव ठाकरे तडकाफडकी शरद पवार यांच्या भेटीला, ‘या’ 23 जागांच्या प्रस्तावासह केला दावा
उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी तडकाफडकी भेटीला आले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेच्या 23 मतदारसंघांची यादी आहे. ठाकरे गट 23 मतदारसंघांवर ठाम आहेत.
मुंबई, 5 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यावर आहे. पण तरीही महाविकास आघाडीचा काही जागांवर अद्याप तिढा कायम आहे. अशातच उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी तडकाफडकी भेटीला आले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेच्या 23 मतदारसंघांची यादी आहे. ठाकरे गट 23 मतदारसंघांवर ठाम आहेत. यापैकी एक ते दोन जागा त्यांची मित्र पक्षाला सोडण्याची तयारी आहे. त्यामुळे ठाकरे गट 20 ते 22 जागांवर निवडणूक लढवू शकतं.उद्धव ठाकरे 23 जागांचा प्रस्ताव घेऊन पवारांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटाचा ‘या’ 23 जागांवर पक्का दावा करण्यात आला आहे, यामध्ये जळगाव, नाशिक, पालघर, ठाणे, कोल्हापूर, बुलढाणा, हातकणंगले, शिर्डी , हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, यवतमाळ, वाशिम, मावळ, रायगड, रामटेक, दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मुंबई, कल्याण-डोंबिवली यांचा समावेश आहे.