370 कलम रद्द करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर उद्धव ठाकरे काय म्हणाले?
कलम 370 हटवण्याचा निर्णय वैध की अवैध, याबाबतचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निकालात केंद्र शासनाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. पाच जणांच्या खंडपीठाने यासंदर्भात तीन निर्णय दिले आहेत. परंतु सर्वांनी केंद्राचा निर्णय योग्य असल्याचंच म्हटलं आहे.
मुंबई : 11 डिसेंबर 2023 | संविधानातील अनुच्छेद 370 हटवण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय योग्यच असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय देताना जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचंही म्हटलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “पुढच्या सप्टेंबरपर्यंत तिथे निवडणुका झाल्या पाहिजेत, तर त्यासुद्धा लवकरात लवकर होतील. तिथल्या जनतेला खुल्या हवेत मतदान करण्याची संधी मिळायला पाहिजे. हे काश्मीरबद्दल झालं. पण निवडणुकांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरसुद्धा यात समाविष्ट झालं, तर संपूर्ण काश्मीरमध्ये निवडणुका होतील आणि काश्मीर हा आपल्या देशाचा भाग असल्याचं कायम राहील. 2019 मध्ये जेव्हा केंद्र सरकारने 370 कलम हटवण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हासुद्धा शिवसेनेनं पाठिंबा दिला होता. आजसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवला आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. त्याचसोबत पुढच्या वर्षी सप्टेंबरमध्ये तिथे निवडणुका होण्यापूर्वी पाकव्याप्त काश्मीरसुद्धा आपल्यात समाविष्ट झाला, तर संपूर्ण देशवासियांना आनंद होईल.”
यावेळी काश्मिरी पंडितांबद्दल बोलताना उद्धव ठाकरेंनी मोदींना सवाल केला. सध्या गॅरंटीचा जमाना आहे. काश्मीर सोडून गेलेले काश्मिरी पंडीत घरवापसी करणार याची गॅरंटी कोण देणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी याची गॅरंटी देतील का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.