Uddhav Thackeray : ‘मी सुद्धा तयार, पण…’, राज ठाकरेंसोबत उद्धव ठाकरे युती करणार? जाहीरपणे घातली एकच अट
'कुणासोबत जाऊन मराठी आणि महाराष्ट्राचं हित होणार आहे. माझ्याबरोबर की भाजपबरोबर. मग पाठिंबा द्या किंवा विरोध करा. बिनशर्त करा. माझी काही हरकत नाहीये. महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे. पण या चोरांना गाठीभेटी आणि कळत न कळत गाठीभेटी आणि त्यांचा प्रचार करायचा नाही. ही पहिली शपथ घ्यायची शिवाजी महाराजांची. मग टाळी द्यायची आणि घ्यायची'
महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी एकत्र येण्याची तयारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एका मुलाखतीत बोलताना दर्शविली. यावरून उद्धव ठाकरेंनी देखील जाहीरपणे तयारी दाखवत एक अट राज ठाकरेंना घातली. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी तयार आहे. मी सुद्धा सर्व मराठी माणसांना मराठीच्या हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन करत आहे. माझी अट एक आहे. महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत करणार नाही, त्याला मी बोलावणार नाही. त्याच्या घरी मी जाणार नाही. त्याचं आगत स्वागत, पंगतीला बसवत नाही, हे आधी ठऱवा मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा’,असा अप्रत्यक्षपणे सल्लाच उद्धव ठाकरेंनी राज यांना दिला. ते म्हणाले, जेव्हा आम्ही लोकसभेत सांगत होतो. महाराष्ट्रातून गुजरातला कारभार घेऊन जात आहेत, तेव्हाच विरोध केला असता तर हे सरकार बसलं नसतं. आज महाराष्ट्राच्या हिताचं सरकार केंद्रात बसवलं असतं आणि राज्यातही महाराष्ट्राच्या हिताचं सरकार बसवलं असतं. त्याचवेळी काळे कामगार कायदे फेकून दिले असते केराच्या टोपलीत. तेव्हा पाठिंबा द्यायचा. आता विरोध करायचा आणि परत तडजोड करायची असं चालणार नाही, असंही उद्धव ठाकरे स्पष्टच म्हणाले.