Video : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! वसईत थोडक्यात स्कूल बसचा मोठा अपघात टळला, 50 विद्यार्थी बालंबाल बचावले
Vasai School Bus accident : गुरुवारी सकाळी शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली स्कूल बस खड्ड्यातून घसरली. यामुळे ही बस रस्त्याच्या एका बाजूला कलंडली. ही बस आला रस्त्यावर उलटते की काय, अशी भीती विद्यार्थ्यांमध्ये पसरली होती.
वसई : राज्यातील अपघातांचं (Road Accident) सत्र थांबत नसून आता वसईतही एका स्कूल बसचा मोठा अपघात थोडक्यात टळलाय. गुरुवारी सकाळी शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली स्कूल बस (School Bus) खड्ड्यातून घसरली. यामुळे ही बस रस्त्याच्या एका बाजूला कलंडली. ही बस आला रस्त्यावर उलटते की काय, अशी भीती विद्यार्थ्यांमध्ये पसरली होती. खड्ड्यात स्किड झाल्यामुळे कलंडलेल्या बसमध्ये जवळपास 50 विद्यार्थी होते. हे विद्यार्थ्यांची (Vasai School Bus Accident) बस कलंडल्यानं एकच घाबरगुंडी उडाली होती. दरम्यान, या बसमध्ये असलेल्या सर्व 50 मुलांना वाचवण्यात यश आलंय. मुलांचा गोंधळ पाहून आजूबाजूच्या लोकांनीही बसच्या दिशेने धाव घेतली आणि बसमधील सर्व विद्यार्थ्यांना खिडकीतून आणि इमर्जन्सी बॅक विंडोमधून बाहेर काढलंय. बसमधून सर्व विद्यार्थी बाहेर आल्यानंतर सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला. काही दिवसांपूर्वी नागपुरातही विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनचा अपघात झाला होता. ही व्हॅन नाल्यात कोसळली होती. त्यानंतर आता वसईत बसचा अपघात झाला असून या अपघातामुळे शाळेत मुलांची ने-आण करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. दरम्यान, थोडक्यात मोठा अनर्थ टळल्यानं पालकांच्याही काळजाचा ठोका चुकलाय.