Video | केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी अखेर हटवली, शेतकऱ्यांना दिलासा
केंद्र सरकारने कांद्याच्या किंमती वाढू नयेत यासाठी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातलेली होती. यावरुन कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी नाराज झाले होते. कांद्याचे दर त्यामुळे कोसळून शेतकऱ्यांची कमाईची संधी बंद झाली होती. या संदर्भात राजकीय पक्षांनी देखील आवाज उठवला होता. त्यानंतर आज अखेर केंद्र सरकारने एकीकडे राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असताना कांद्यावरील निर्यात बंदी हटवून शेतकऱ्यांना उशीरा का होईना पण दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबई | 18 फेब्रुवारी 2024 : केंद्र सरकारने अखेर कांद्यावरील निर्यात बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. कांद्यावरील निर्यात बंदी हटविण्याची मागणी महाराष्ट्रासह अनेक राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लावून धरली होती. देशातील कांद्याच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली होती. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कमाई करण्याची मोठी संधी गमावली. या संदर्भात राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेत नुकतेच केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीने युरोपात पाकिस्तानच्या कांद्याला चांगला भाव मिळून तेथील शेतकऱ्यांचा मोठा फायदा झाल्याचे सांगत कांदा उत्पादकांची कमाईची संधी गेल्याचे भाषणात सांगितले होते. कांदा निर्यात बंदीवरील आदेश मागे घेण्याचा आदेश गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आज घेतला. केंद्र सरकारने 31 मार्चपर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घातली होती. परंतू डेडलाईन आधीच सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपला कांदा परदेशात देखील निर्यात करता येणार आहे. कांदा हे नाशवंत पिक असल्याने ऐन हंगामात निर्याद बंदी घातल्याने कांद्याचे दर घसरुन शेतकऱ्यांना मोठा तोटा झाला होता.