विजय शिवतारेंची टिवटिवच बंद केली : अजित पवार
विजय शिवतारे यांना या निवडणुकीत आमदार होऊ देणार नाही, अशा शब्दात लोकसभा निवडणुकीदरम्यान अजित पवारांनी चॅलेंज दिलं होतं.
मुंबई : राष्ट्रवादीकडून अजित पवार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड झाली. अजित पवार यांना विरोधीपक्ष नेतेपदाची संधी मिळाल्यानंतर त्यांनी सत्ताधाऱ्यांना चिमटे काढण्याची संधी सोडली नाही. सत्ताधाऱ्यांची दिवाळी गोड झाली नाही, असा टोला अजित पवारांनी लगावला. तर विजय शिवतारे यांची टिवटिवच बंद केली, असा निशाणाही अजित पवारांनी (Ajit Pawar on Vijay Shivtare) साधला.
विजय शिवतारे यांना या निवडणुकीत आमदार होऊ देणार नाही, अशा शब्दात लोकसभा निवडणुकीदरम्यान अजित पवारांनी चॅलेंज दिलं होतं. विजय शिवतारेंचा एकेरी उल्लेख करत, बघतोच कसा आमदार होतो ते, असं अजित पवार म्हणाले होते. पुरंदरमधून विजय शिवतारे यांचा काँग्रेसच्या संजय जगताप यांनी पराभव केला.
‘आपण विरोधी पक्षात राहणार आहोत. आपण आघाडीत लढलो आहोत. आपली संख्या 110 पर्यंत जाते. आपण शंभरीपार जाऊ, याची खात्री मला होती. कारण मला अंडरकरंट जाणवत होता. शरद पवारांनी जो झंझावाती दौरा केला, त्यानंतर मतपरिवर्तन पाहायला मिळालं’ असं अजित पवार म्हणाले.
पहिल्यांदाच असं झालं की, सत्ताधाऱ्यांची दिवाळी गोड झाली नाही, पण आपण मात्र खुशीत आहोत, समाधानी आहोत, असं अजित पवार म्हणाले.
अपक्ष आमदार सत्ताधारी पक्षाकडे झुकत असतात. लोकसभेत पाहिजे तसं यश मिळालं नाही. काही जीवाभावाचे सहकारी सोडून गेले. मात्र ते सोडून गेले ते बरोबर असते, तर सत्ता आली असती, अशी खंतही अजित पवारांनी बोलून दाखवली.
‘माझी विधीमंडळ नेतेपदी निवड केल्याबद्दल धन्यवाद. निवडणुकीत जे पराभूत झाले आहेत, त्यांनी नाउमेद होऊ नये. पराभूत उमेदवारांशी संवाद साधला जाईल’ असं म्हणत अजित पवारांनी पराभूत उमेदवारांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
मला अजूनही विश्वास बसत नाही की मी 1 लाख 65 हजार मताधिक्याने निवडून आलो. बारामतीच्या लोकांनी हे प्रेम दाखवलं याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असंही अजित पवार यांनी नमूद केलं.
Ajit Pawar on Vijay Shivtare