“शिवसेनेचे आमदार फोडणं दूरच, उलट सत्तेला चिकटून राहणारे रवी राणाच शिवसेनेत येतील”
शिवसेनेचे 20-25 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा करणारे अपक्ष आमदार रवी राणा यांच्यावर माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी (Prakash Shendage on Ravi Rana) हल्ला चढवला आहे.
मुंबई : शिवसेनेचे 20-25 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा करणारे अपक्ष आमदार रवी राणा यांच्यावर माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी (Prakash Shendage on Ravi Rana) हल्ला चढवला आहे. शिवसेनेचे आमदार फोडणे तर दूरच राहिले, मात्र, शिवसेना सत्तेत आल्यावर आमदार रवी राणाच शिवसेनेमध्ये दाखल होतील, असं मत माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी (Prakash Shendage on Ravi Rana) व्यक्त केलं.
प्रकाश शेंडगे म्हणाले, “आमदार रवी राणा यांचा पूर्व इतिहास बघितला, तर अपक्ष म्हणून निवडून येतात. त्यानंतर जे सत्तेत असते त्यांना चिकटून असतात. आता शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे पुढील काळात रवी राणाच शिवसेनेमध्ये आलेले दिसतील. रवी राणा 25 आमदार फोडायची भाषा करत आहेत. आता ते दिवस गेले आहेत. ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ कुणीही पाहू नये. आता शिवसेनेचा आमदार फोडणे सोपे नाही.”
महाराष्ट्रातील धनगर-बंजारा बाराबलुतेदार पूर्ण ताकदीनिशी शिवसेनेच्या बाजूने उतरला आहे. आता मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेला लवकरच शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेताना दिसेल. हीच जनतेची इच्छा आहे, असंही शेंडगे यांनी नमूद केलं.
“भाजपला पाठिंबा देणाऱ्या घटकपक्षांच्या बुद्धीची कीव येते”
भाजपच्या घटक पक्षांनी राज्यपालांची भेट घेत भाजपलाच निमंत्रण देण्याची मागणी केली आहे. यावर बोलताना प्रकाश शेंडगे यांनी या घटक पक्षांच्या बुद्धीची कीव येते, असा टोमणा लगावला आहे. ते म्हणाले, “भाजपकडे अजून बहुमत नाही. अशातच घटकपक्ष देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनावण्यासाठी निमंत्रण देण्याची मागणी करतात. त्यांना निमंत्रण दिलं तरी त्यांच्याकडे बहुमत नाही. त्यामुळे भाजप मित्र पक्ष हात दाखवून अवलक्षण करण्याचा प्रकार करत आहेत. भाजपच्या या मित्रपक्षांनी उलट भाजप-शिवसेना युती कशी होईल याकडं लक्ष द्यायला हवं.”
मुख्यमंत्री शिवसेनेचाच झाला पाहिजे, अशी आमची सुरुवातीपासूनच भावना आहे. आम्ही या निवडणुकीमध्ये आमचा पाठिंबा फक्त शिवसेनेला दिला होता. त्यामुळे आमची भावना युतीचा मुख्यमंत्री होण्याची नसून शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा असा आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समर्थनावर शिवसेनेचा मुख्यमंत्री चालेल का?
प्रकाश शेंडगे यांनी यावेळी काहीही करुन शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, “महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल. मग तो भाजपच्या पाठिंब्यावर होईल किंवा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर. आमची इच्छा एवढीच आहे. या महाराष्ट्रामध्ये शिवरायांच्या स्वराज्याच्या अनुभव पुन्हा घ्यायचा आहे. बारा बलुतेदार आलुतेदार यांना अठरापगड जमातीला न्याय द्यायचा आहे, असा शब्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिला आहे.