शरद पवारांची साथ सोडलेल्या आमदारांचं काय झालं?
राणा जगजितसिंह पाटील, भास्कर जाधव या दोघा आमदारांनाच विजय मिळवता आला आहे. दिलीप सोपल, वैभव पिचड, पांडुरंग बरोरा यांना पराभवाचा धक्का बसला.
मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांनी पक्षाची साथ सोडून सत्ताधाऱ्यांचा हात धरला होता. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साथ सोडणाऱ्या बहुतांश आमदारांना जनतेने नाकारलं (MLAs who left NCP Sharad Pawar). कारण राष्ट्रवादी सोडलेल्या सात आमदारांपैकी केवळ दोघांना निवडणुकीत यश आलं, तर पाच जणांना पराभव स्वीकारावा लागला. राणा जगजितसिंह पाटील, भास्कर जाधव या दोघा आमदारांनाच विजय मिळवता आला आहे. दिलीप सोपल, वैभव पिचड, पांडुरंग बरोरा यांना पराभवाचा धक्का बसला.
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले आमदार
राणा जगजितसिंह पाटील – राष्ट्रवादी ते भाजप – तुळजापूर, उस्मानाबाद – विजयी बबनराव पाचपुते – राष्ट्रवादी ते भाजप – श्रीगोंदा, अहमदनगर – विजयी वैभव पिचड – राष्ट्रवादी ते भाजप – अकोले, अहमदनगर – पराभूत नमिता मुंदडा – (आमदार नव्हत्या) – राष्ट्रवादी ते भाजप – केज, बीड – विजयी
नमिता मुंदडा यांच्याविषयी फारच रंजक गोष्ट घडली. शरद पवार यांनी मुंदडा यांना केजमधून उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यानंतर मुंदडा यांनी पक्षाला रामराम ठोकला आणि भाजपचा झेंडा हाती धरला. त्या याआधी आमदार नव्हत्या. परंतु भाजपच्या तिकीटावर त्या निवडून आल्या आहेत.
राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये गेलेले आमदार
भास्कर जाधव – राष्ट्रवादी ते शिवसेना – गुहागर, रत्नागिरी – विजयी जयदत्त क्षीरसागर – राष्ट्रवादी ते शिवसेना – बीड, बीड – पराभूत पांडुरंग बरोरा – राष्ट्रवादी ते शिवसेना – शहापूर, ठाणे – पराभूत दिलीप सोपल – राष्ट्रवादी ते शिवसेना – बार्शी, सोलापूर – पराभूत रश्मी बागल – (आमदार नाही) – राष्ट्रवादी ते शिवसेना – करमाळा, सोलापूर – पराभूत शेखर गोरे – (आमदार नाही) राष्ट्रवादी ते शिवसेना – माण, सातारा – पराभूत
जयदत्त क्षीरसागर यांची लढत पुतणे संदीप क्षीरसागर यांच्याशी होती, तर शेखर गोरे हे सख्खा भाऊ जयकुमार गोरेला भिडले होते.
आमदारांनी साथ सोडण्याची पहिलीच वेळ नाही
1980 मध्ये 52 आमदार शरद पवारांना सोडून गेले (MLAs who left NCP Sharad Pawar) होते, पण पुढच्या निवडणुकीत त्यातला एकही निवडून आला नाही, अशी आठवण शरद पवारांनी एकदा सांगितली होती.
काय घडलं होतं?
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1975 ते 1977 या कालावधीत देशव्यापी आणीबाणी जाहीर केली होती. मार्च 1977 च्या लोकसभा निवडणुकांनंतर 21 मार्च 1977 रोजी आणीबाणी उठली. त्यावेळी काँग्रेसला दणदणीत पराभवाचा सामना करावा लागला होता. जनता पक्षाचे मोरारजी देसाई पंतप्रधानपदी निवडून आले. ते भारताचे पहिले काँग्रेसेतर पंतप्रधान ठरले होते.
आणीबाणीचा परिणाम काँग्रेसवर मोठ्या प्रमाणात झाला होता. 1978 मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली आणि यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी काँग्रेसची स्थापना झाली.
महाराष्ट्रात पुलोद सरकार
1978 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पुलोद सरकार स्थापन झालं. शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 1980 साली इंदिरा गांधींचं सत्तेत पुनरागमन झालं आणि त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकार बरखास्त केली. यामध्ये शरद पवारांच्या सरकारचाही समावेश होता.
जेव्हा शरद पवारांची साथ सोडलेले 52 आमदार पुढच्या निवडणुकीत पडले!
जून 1980 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 288 पैकी 186 जागा जिंकल्या. समाजवादी काँग्रेसला फक्त 47 जागा जिंकता आल्या होत्या. बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री झाले. त्यावेळी शरद पवार विधानसभेतील प्रमुख विरोधी नेते होते.
पवारांचा दौरा आणि आमदारांनी साथ सोडली
विधानसभेत निवडून आलेले आमदार एक-एक करत शरद पवारांची साथ सोडत गेले. शरद पवार कामानिमित्त लंडन दौऱ्यावर गेले असताना मोठ्या संख्येने आमदारांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. फक्त सहा आमदार (MLAs who left NCP Sharad Pawar) शरद पवार यांच्यासोबत राहिले. त्यामुळे पवारांचं विरोधी पक्षनेतेपदही गेलं होतं.