Agriculture News : वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, भाजीपाल्याचं मोठं नुकसान
पंधरा दिवसापुर्वी झालेल्या पावासाने सुध्दा चांगलचं नुकसान केलं होतं. त्यावेळी नुकसान झालेल्या भागाला अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आणि पंचनामे झाले. अद्याप मदत मिळाली नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे.
वाशिम : वाशिमसह (Washim) जिल्ह्यातील मालेगांव, रिसोड, मंगरुळपिर, कारंजा आणि मानोरा तालुक्यात काल सायंकाळी तसेच रात्रभर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस (Unseasonal Rain) झाला आहे. तर मंगरूळपीर तालुक्यातील कंझरा, चांभाई, मोहगव्हान, येडशी, शेलुबाजार परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. गहू,ज्वारी,उन्हाळी मूग, बीजवाई कांदा, टोमॅटो सह भाजीपाला, टरबूज पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर (Farmer) अस्मानी संकट आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पंधरा दिवसापुर्वी झालेल्या पावसाने सुध्दा मोठं नुकसान केलं होतं.
मंगरूळपीर तालुक्यातील कंझरा, चांभाई फाटा, मोहगव्हान, येडशी, शेलुबाजार परिसरातील जोराची गारपीठ झाली, अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतात असलेले गहु, हरभरा, उन्हाळी मूग व बिजवाई कांदा या पीकांचं नुकसान झालं. गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे पपई, बिजवाई कांदा, टरबूज तसेच भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
मंगरूळपीर तालुक्यातील कंझरा येथील मदन किसनराव मुखमाले यांच्या घरावर वीज पडली, ज्यावेळी वीज पडली त्यावेळी मोठा आवाज झाल्याने लोकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेत मनुष्यहानी झालेली नसून सर्व परिसरातील नागरिक सुखरूप आहेत. तर दुसरीकडे मंगरुळपीर उपविभागिय पोलीस अधीकारी कार्यालयाची आज झालेल्या सुसाट वारा, धूव्वाधार पाऊस आणि गारपिटीने धांदल उडाली. जिल्ह्यातील किती हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले, हे अद्याप निश्चित सांगता येत नसले तरी त्याचा प्राथमिक अंदाज आज दुपारी स्पष्ट होणार आहे.
पंधरा दिवसापुर्वी झालेल्या पावासाने सुध्दा चांगलचं नुकसान केलं होतं. त्यावेळी नुकसान झालेल्या भागाला अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आणि पंचनामे झाले. अद्याप मदत मिळाली नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे.