Rabi Season : शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला पण मुख्य पिकालाच फटका बसला
उत्पादनात वाढीसाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार यंदा रब्बी हंगामात पीक पध्दतीमध्ये मोठा बदल केला आहे. ज्वारी, गव्हाकडे दुर्लक्ष करीत मराठवाड्यात यंदा हरभरा पिकाचा विक्रमी पेरा झाला आहे. मात्र, पेरणीपासून या पिकावर अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणाचे संकट कायम राहिलेले आहे.
जालना : उत्पादनात वाढीसाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार यंदा (Rabi Season) रब्बी हंगामात पीक पध्दतीमध्ये मोठा बदल केला आहे. ज्वारी, गव्हाकडे दुर्लक्ष करीत (Marathwada) मराठवाड्यात यंदा हरभरा पिकाचा विक्रमी पेरा झाला आहे. मात्र, पेरणीपासून या पिकावर अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणाचे संकट कायम राहिलेले आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याचा धोका निर्माण झाला असून सध्या हरभरा हे पीक फुलोऱ्यात आहे. पीक ऐन जोमात असताना गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने घाटीअळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. (Kharif Season) खरीप हंगामात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बीत पीक पध्दतीमध्ये बदल केला आहे. मात्र, निसर्गाचा लहरीपणा असाच कायम राहिला तर वाढीव उत्पन्न तर सोडाच पण सध्या पिकांवर होत असलेला खर्चही पदरी पडतो की नाही अशी स्थिती जालना जिल्ह्यातील भोकरदण तालुक्यामध्ये झाली आहे.
मुबलक पाणी असूनही उपयोग होईना
दरवर्षी पाण्याअभावी रब्बी हंगामातील पीके धोक्यात असतात. यंदा पेरणी दरम्यान, पोषक वातावरण होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीच्या अनुशंगाने हरभरा पिकाचा पेरा केला होता. त्याच बरोबर ज्वारी या हंगामातील मुख्य पीकाला बाजूला सारत शेतकऱ्यांनी उत्पन्नाच्या दृष्टीने कडधान्यांवर अधिक भर दिलेला होता. सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना पाण्याची चिंता नव्हती मात्र, ओढावलेल्या परस्थितीमुळे पाणी असूनही त्याचा योग्य उपयोग होत नाही. अवकाळी, ढगाळ वातावरण यातूनच पीकांचे संरक्षण करण्यासाठी एकरी हजारो रुपये शेतकऱ्यांना खर्ची करावे लागत आहेत. त्यामुळे योग्य असे मार्गदर्शन करण्याची मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.
काय आहे पीकांची अवस्था?
यंदा रब्बी हंगामातील पेरा महिन्याभराने उशिरा झाला असला तरी पेरणी दरम्यान पोषक वातावरण होते. त्यामुळे पिकांची वाढ जोमात झाली आहे. मात्र, गेल्या 15 दिवसांपासून वातावरणातील बदल आणि सध्याचे ढगाळ वातावरण यामुळे हरभरा पिकावर घाटीअळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. तर गव्हावरही तांबोरा रोगाचा धोका वाढत आहे. ज्वारी पोटऱ्यात असताना वाऱ्यामुळे पडझड होत आहे. खरीप हंगामात झालेले नुकसान रब्बी हंगामात भरुन काढता येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती पण वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांचा हा निर्धार तरी यशस्वी होणार का याबाबत शंका उपस्थित होऊ लागली आहे.
काय आहे कृषी विभागाचा सल्ला?
ढगाळ वातावरणाचा सर्वाधिक परिणाम हा हरभरा पिकावर दिसू येत आहे. शिवाय हे पीक ऐन फुलोऱ्यात आल्याने घाटे लागण्याच्या अवस्थेतच घाटीअळीचा प्रादुर्भाव यामुळे थेट उत्पादनावरच परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा पिकावर निंबोळी अर्क + हिमामॅक्टिन बैनझाऐट किंवा एच.एन.पी.व्ही जैविक औषधांची फवारणी करण्याचा सल्ला कृषी सहायक नंदकिशोर पायघन यांनी दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य वेळी याची फवारणी केली तरच हरभऱ्यातून उत्पन्न मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
संबंधित बातम्या :
Grape Growers Association: निर्णय झाला- आता माघार नाही, सोलापूर विभागातही ठरले द्राक्षांचे दर
Sugar Factory: तेरणा सांगा कुणाचा? भैरवनाथ की ट्वेंटी वन, फैसला 31 जानेवारीला..! वाचा सविस्तर