Nashik : बंधारा फुटला अन् शेतात पाणी घुसले, भात शेतीचे होत्याचे नव्हते झाले..!
पाण्याची साठवणूक व्हावी आणि उन्हाळ्यात पाणीटंचाईवर मात करता यावी म्हणून फणसपाडा ग्रामस्थ व के.जे. सोनावाला ट्रस्टच्या माध्यमातून हा बंधारा उभारण्यात आला होता. भविष्यात प्रशासनाकडून याची देखभाल आणि दुरुस्ती होणे अपेक्षित असताना वेळोवेळी दुर्लक्ष झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरगाणा तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे धरणात पाणीसाठा वाढला होता. दरम्यानच्या काळात धरणातील पाण्याचा विसर्ग सुरु राहिला असता तर हे संकट ओढावले नसते.
मालेगाव: गेल्या 8 दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शेती क्षेत्राचे चित्रच बदलले आहे. जिथे पाण्याअभावी संपूर्ण खरीप हंगाम धोक्यात होता तिथे आज पावसाच्या पाण्यामुळे धोका वाढला आहे. पिकांची उगवण होताच शेती क्षेत्रात पाणी साठल्याने नुकसान सुरुच आहे पण (Nashik Farmer) नाशिक जिल्ह्यातील सुरगणा तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. फणसपाडा येथील (Dam burst) बंधारा फुटल्याने सर्व पाणी शेत शिवरात घुसले आहे. त्यामुळे 25 शेतकऱ्यांच्या (Paddy Crop) भातशेतीचे नुकसान झाले आहे. पिकांसह शेतजमिनही खरडून गेल्याचा प्रकार झाला आहे. बंधाऱ्यातून वेळोवेळी पाण्याचा विसर्ग सुरु न ठेवल्यानेच ही परस्थिती निर्माण झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. प्रशासनाच्या एका चुकीमुळे शेकडो एकरातील भातपिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
ग्रामस्थांनीच उभारला होता बंधारा
पाण्याची साठवणूक व्हावी आणि उन्हाळ्यात पाणीटंचाईवर मात करता यावी म्हणून फणसपाडा ग्रामस्थ व के.जे. सोनावाला ट्रस्टच्या माध्यमातून हा बंधारा उभारण्यात आला होता. भविष्यात प्रशासनाकडून याची देखभाल आणि दुरुस्ती होणे अपेक्षित असताना वेळोवेळी दुर्लक्ष झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरगाणा तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे धरणात पाणीसाठा वाढला होता. दरम्यानच्या काळात धरणातील पाण्याचा विसर्ग सुरु राहिला असता तर हे संकट ओढावले नसते. मात्र, प्रशासनाच्या चुकीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकरी आणि ट्रस्टने उभारलेल्या बंधाऱ्याची आता दुरुस्ती होणार का हे पहावे लागणार आहे.
पिकांची उगवण अन् वहिवाट एकाच वेळी
यंदा जूनमध्ये पावसाने उघडीप दिल्याने खरिपातील पेरण्या महिन्याने लांबणीवर पडल्या होत्या. पेरणीनंतर लागलीच झालेल्या पावसामुळे पिकांची उगवणही झाली. मात्र, पाऊल लागून राहिल्याने शेत शिवारात पाणी साचून राहिले होते. हे कमी म्हणून की काय बंधाऱ्यातील पाणी थेट शेतशिवरात घुसल्याने उरली-सुरली आशाही मावळली आहे. बंधारा फुटल्याने 20 ते 25 शेतकऱ्यांच्या पिकांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.
पाणीपातळीत वाढ, जलस्त्रोत ‘ओव्हरफ्लो’
हंगामाच्या सुरवातीला पावसाच्या लहरीपणामुळे यंदाही पाणी संकट ओढावणार अशी स्थितीच निर्माण झाली होती. मात्र, जुलैच्या पहिल्या दिवसापासून सुरु झालेल्या पावसाने सर्व चित्रच बदलून टाकले आहे. शेत शिवारात तर पाणीच पाणी झाले आहे. पण नदी, नाले, ओढे हे तुडूंब भरुन वाहत आहेत. सध्या पिकांचे नुकसान झाले असले तरी भविष्यातील पाणीटंचाईचे संकट हे दूर झाले आहे. पाणीपातळीत वाढ झाली आहे.