Kharif Season : खरिपाच्या पेरण्या लांबणीवर, तरीही चिंता नाही, चाढ्यावर मूठ ठेवण्यापूर्वी शेतकऱ्यांना महत्वपूर्ण सल्ला
केवळ उत्पादनवाढीसाठीच नाही तर किडमुक्त पिकांच्या उगवणीसाठी बीजप्रक्रिया ही महत्वाची आहे. पेरणीपूर्वी ही प्रक्रिया केली जाते. त्यामुळे बी जमिनीत गाढले तरी त्याला बुरशीजन्य रोगांची लागण होत नाही. शिवाय उगवणीनंतर पीक फुलोऱ्यापर्यंत सर्व अवस्थांमध्ये सदर उपकारक सूक्ष्मजीव मूळाभोवती कार्यरत राहून पीक पोषणासाठी उपयुक्त ठरतात.
लातूर : राज्यात (Monsoon) पावसाचे आगमन उशीरा झाले असले तरी आता कुठे पाऊस सर्वत्र सक्रीय होत आहे. यंदा वेळेपूर्वी पावसाचे आगमन होणार असल्याचा अंदाज होता पण दरवर्षीपेक्षा तीन दिवस उशीराने पाऊस दाखल झालेला आहे. त्यामुळे (Kharif Sowing) खरिपाच्या पेरण्यावर तीळ मात्र परिणाम झालेला नाही. शिवाय पेरणीसाठी उशीर झाला तरी त्याचा थेट परिणाम (Production) उत्पादनावर होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिमी पावसाची नोंद झाल्यावर आणि शेतजमिनीत योग्य ओल असल्यावरच चाढ्यावर मूठ ठेवणे फायद्याचे राहणार असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले. शिवाय पावसाने उशीरा हजेरी लावली तरी त्याचा उत्पादनावर काही परिणाम नाही. उलट अशा वेळी वाणाची निवड करुन उत्पादन वाढविता येत असल्याचा सल्ला कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी दिला आहे. त्यांचा सल्ला अनेक शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी आणि नुकसान टाळण्यासाठी उपयोगी ठरणार आहे.
बीजप्रक्रियेनंतर बियाणे जमिनीत गाढा
केवळ उत्पादनवाढीसाठीच नाही तर किडमुक्त पिकांच्या उगवणीसाठी बीजप्रक्रिया ही महत्वाची आहे. पेरणीपूर्वी ही प्रक्रिया केली जाते. त्यामुळे बी जमिनीत गाढले तरी त्याला बुरशीजन्य रोगांची लागण होत नाही. शिवाय उगवणीनंतर पीक फुलोऱ्यापर्यंत सर्व अवस्थांमध्ये सदर उपकारक सूक्ष्मजीव मूळाभोवती कार्यरत राहून पीक पोषणासाठी उपयुक्त ठरतात. ही प्रक्रिया अगदी सहज असली तरी पीक वाढ आणि उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाची आहे.
पेरणी करतानाच द्या खताचा डोस
बियाणाच्या बीजप्रक्रियेनंतर सर्वात महत्वाचे म्हणजे पेरणी करतानाच खताचा डोस देणे. त्यामुळे उगवण क्षमता तर वाढतेच पण पिकांची ताकदही वाढते. शिवाय उगवताच कोणत्याही रोगराईचा प्रादुर्भाव होत नाही. एवढेच नाही तर पेरताना ही काळजी घेतली तर उत्पादकताही वाढते. पेरणी करतानाच उत्पादनाचे गणित ठरविण्यास मदत होते पण त्यासाठी योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे.
उशीरा पाऊस हा फायद्याचाच
सध्या पावसाने उघडीप दिली असल्याने खरिपाचे भवितव्य काय असा सवाल समोर येत आहे. मात्र, यामुळे नुकसान तर काही होणार नाही उलट पावसाने उशीर केला तर त्यानुसार वाणाची निवड करुन उत्पादनात वाढ करता येते. जसे की कापसामध्ये जसा उशीर होईल त्यानुसार मध्यम कालावधी, कमी कालावधी अशा वाणांची निवड करुन पेरणी करता येते.विशेषत: सोयाबीन पेरणीला उशीर झाला तर परतीच्या पावसाने होणारे नुकसान टळणार आहे.
पहिल्या पावसानंतर या पिकांचा पेरा करा
खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली असून शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे ती पावसाची. शिवाय पहिला पाऊस झाला की शेतकऱ्यांनी सोयाबीन कापसाला नव्हे तर उडीद, मूग अशा कडधान्यांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. यामुळे कमी कालावधीत अधिकचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळणार आहे.
ओलीचे व्यवस्थापन झाले तरच करा धाडस
सध्या नाही म्हणलं तरी मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आणि बीडच्या काही भागांमध्ये कापसाचा पेरा झाला आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे त्यांनीच हे धाडस करावे. अन्यथा वेळ, आर्थिक नुकसान आणि दुबार पेरणीचे संकट ओढावण्याचा धोका आहे.