Rabi Season : गव्हावरील तांबेरा रोगाचे वेळीच कार व्यवस्थापन अन्यथा होईल उत्पादनात घट
गव्हाचे उत्पादन तर वाढलेले आहे पण वातावणातील बदलामुळे तांबोरा रोगाचे प्रमाण हे वाढत आहे. गव्हावर तांबोरा रोगाचा अधिक प्रादुर्भाव झाल्यास पिकाची वाढ तर खुंटतेच पण वार्षिक उत्पन्न हे देखील घटते.
औरंगाबाद : रब्बी हंगामात गव्हाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सुरवातीच्या काळात पावसामुळे वाफसा नव्हता. शिवाय पुन्हा ज्वारी पेऱ्याला उशिर झाला असल्याने केवळ गव्हासाठी पोषक वातावरण राहिले होते. यंदा सरासरीच्या तुनलेत दुपटीने पेरा होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवलेला आहे. त्यानुसार सर्व राज्यात असेच चित्र पाहवयास मिळत आहे. गव्हाचे उत्पादन तर वाढलेले आहे पण वातावणातील बदलामुळे तांबोरा रोगाचे प्रमाण हे वाढत आहे. गव्हावर तांबोरा रोगाचा अधिक प्रादुर्भाव झाल्यास पिकाची वाढ तर खुंटतेच पण वार्षिक उत्पन्न हे देखील घटते.
त्यामुळे यंदाच्या हंगामात गव्हाचे विक्रमी उत्पादन घ्यावयाचे असेल आगोदर तांबोरा रोगाचे नियंत्रण कसे करावे याची माहिती शेतकऱ्यांना असणे गरजेचे आहे. गव्हावर खोडावरील काळा तांबेरा, पानावरील नारंगी तांबेरा येतो. विशेषतः आपल्याकडे थंडी कमी असल्यामुळे बहुतेक करून पिवळा तांबेरा येत नाही. तांबेरा रोगाचा प्रसार हवेद्वारे रोगाचे बिजाणूद्वारे होतो.
गव्हाच्या पानावरील नारंगी तांबेरा
या रोगाची लागण जानेवरी फेब्रुवारी महिन्यात अधिक प्रमाणात दिसून येते. रोगाची तीव्रता जास्त असल्यास खोडावरही लक्षणे दिसून येतात. पानावर पिवळे गोलाकार ठिपके तर त्याचे रुपांतर पुन्हा बारीक मोहरीच्या आकाराच्या फोडात होते. याच फोडातून नारंगी रंगाची बिजाणूची भुकटी बाहेर येते. थंड हवामान व आर्द्रता जास्त दिवस टिकून राहिल्यास रोगाचा प्रसार झपाट्याने होतो.
खोडावरील काळा तांबेरा
तांबेरा रोगाचे वेगवेगळे प्रकार आहेत. हा रोग पानावर, खोडावर, ओंबीवर आढळतो. पानावर सुरवातीला लहान तपकिरी ठिपके दिसतात आणि त्यातूनच विटकरी रंगाची बिजाणू बाहेर पडतात. लांबट , गोल ठिपके दोन शिरांमध्ये वाढतात. अनेक ठिपके मिळून सर्वच पान व्यापून जाते. पानाप्रमाणेच खोडावर, ओंबीवर व ओंबीतील दाण्यावरही रोगाचा प्रादुर्भाव आढळतो. हे काळे ठिपके खोडावर लांबट व स्पष्टपणे एकमेकांत मिसळलेले आढळतात, म्हणून त्याला खोडावरील काळा तांबेरा म्हणतात.
तांबोरा रोगाचे असे व्यवस्थापन
गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवाडयात करावी. पेरणी करताना शक्यतो कृषी विद्यापीठाने वाणांचाच वापर करावा. रोगप्रतिकार वाणांमध्ये एच .डी – 2189, परभणी – 51, एच डी.एम – 1553 (सोनालीका ), एच .डी – 4502 या वाणांचा वापर फायदेशीर ठरतो. खताचा डोस देताना नत्र, स्फुरद, यांचे प्रमाण 2:1 ठेवावे. पिकास पाणी देतान बेताने व गरजेपुरतेच द्यावे. रोगाचे लक्षण दिसून येताच 2 ते 2.5 ग्रॅम डायथेन एम- 45 प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास शेतकऱ्यांचा फायदा होतो.
गव्हावरील काणी : हा बुरशीजन्य रोग असून रोगाची बुरशी बियांमध्ये असते. अशा बियांपासून आलेली रोपेही काणीग्रस्त ओंबी देतात. रोगट बियांपासून उगवलेल्या झाडांच्या काणीग्रस्त ओंब्या लवकर बाहेर पडलेल्या दिसतात. बुरशी झांडाबरोबर शरीरांतर्गत वाढत असते. नंतर बीजांडकोषावर वाढून त्याची काळी बिजाणू तयार होते . हे बिजाणू हवेतून सहजरीत्या निरोगी ओंबीतील फुलोऱ्यात प्रवेश करून त्यात वाढतात व बियाणे रोगट बनतात.
काणीचे व्यवस्थापन
बियाण्यास 540 से. तापमान असलेल्या पाण्यात दहा मिनिटे बुडवून काढावे व नंतर सावलीत वाळवावे किंवा बियाण्यास सौर प्रक्रिया द्यावी. यापैकी कोणतीही पद्धत वापरण्यापूर्वी चार तास बियाणे थंड पाण्यात भिजवावे व नंतर प्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास कार्बेन्डॅझिम दोन ग्रॅन प्रतिकिलो या प्रमाणात बिजप्रक्रिया करावी. काणीग्रस्त रोगट झाडे दिसताच ती शेतकऱ्यांना काढून टाकणे गरजेचे आहे.