Tomato Rate : शेतकऱ्याची कमाल, टोमॅटो विक्रीतून एकाच दिवसात कमावले 38 लाख
Tomato Rate : काय शेतकरी टोमॅटो विक्रीतून एका दिवसात 38 लाख रुपये कमावू शकतो? तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. पण देशात या राज्यातील शेतकऱ्यांनी ही कमाल करुन दाखवली आहे. तुमच्या आजूबाजूला अशी यशोगाथा आहे का?
नवी दिल्ली : टोमॅटोचे भाव (Tomato Price) देशात गगनाला भिडले आहेत. भारतीय भाजीपाला बाजारात सर्वच भाज्या महागल्या आहेत. पण टोमॅटोने सर्व उच्चांक मोडीत काढले आहेत. दररोज एक विक्रम टोमॅटो नोंदवत आहे. त्यातच उत्तर भारतात पावसाने गेल्या 50 वर्षांतील रेकॉर्ड मोडले आहेत. त्यामुळे पीकाचे मोठे नुकसान झाले आहे.उत्तर भारतात टोमॅटोचे उत्पादन होत नसले तरी दक्षिण आणि पश्चिम भारतातील राज्यात टोमॅटोचे उत्पादन सुरु आहे. येत्या काही दिवसांत या भागात नवीन पिक पण हाती येईल. दरवाढीचा फायदा व्यापारी आणि दलालांना होत असल्याची ओरड सुरु आहे. शेतकऱ्यांना जास्त फायदा होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. पण या राज्यातील शेतकरी त्याला अपवाद ठरले आहेत. त्यांनी एकाच दिवसात 38 लाख रुपये कमावले आहेत.
दर भिडले गगनाला केंद्र सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, टोमॅटोच्या किंमतीत गेल्या एका महिन्यात 326.13 टक्क्यांची वाढ झाली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे उत्तर भारतात भाजीपाल्याच्या किंमती, विशेषतः टोमॅटोच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.
दक्षिणेतील राज्यांत उत्पादन सध्या दक्षिणेतील राज्यातील उत्पादनावर किंमती अवलंबून आहेत. टोमॅटोचे उत्पादन देशात जवळपास सर्वच राज्यात घेण्यात येते. पश्चिमी आणि दक्षिणेतील राज्यात टोमॅटोचे उत्पादन जास्त होते. या भागात जवळपास 56 ते 58 टक्के उत्पादन घेण्यात येते. याभागात उत्पादन वाढले आहे. त्याचा फायदा उत्तर भारताला होणार आहे.
टोमॅटोमुळे 38 लाखांची कमाई टाईम्स ऑफ इंडियातील एका रिपोर्टनुसार, ग्राहक चढ्या दरामुळे हैराण झाले आहेत. तर लाखो कुटुंबियांनी टोमॅटोवर अघोषीत बहिष्कार घातला आहे. पण शेतकऱ्यांना यामुळे बंपर कमाईची संधी मिळाली आहे. कर्नाटकमधील कोलार येथील एका शेतकरी कुटुंबाने एकूण 2000 टोमॅटोच्या पेट्या विक्री केल्या. त्यातून त्यांना एकूण 38 लाख रुपयांची कमाई केली.
या कुटुंबाला झाला फायदा कोलार येथील प्रभाकर गुप्ता आणि त्यांच्या भावाकडे जवळपास 40 एकर जमीन आहे. त्यांचे कुटुंबिय गेल्या 40 वर्षांपासून जमीन कसत आहेत. त्यांनी एकूण 2000 टोमॅटोच्या पेट्या विक्री केल्या. त्यातून त्यांना एकूण 38 लाख रुपयांची कमाई केली.
एक पेटीचा इतका भाव प्रभाकर गुप्ता 15 किलोचा टोमॅटोचा एक बॉक्स विक्री करतात. यापूर्वी त्यांना 800 रुपयांचा भाव मिळाला होता. पण या मंगळवारी त्यांना 15 किलोचा टोमॅटोचा एका बॉक्ससाठी 1900 रुपये मिळाले. गुप्ता यांच्या भावाला पण उच्चप्रतीच्या टोमॅटो विक्रीतून मोठा फायदा झाला.
कमाल भाव मिळाला टोमॅटो विक्रेते शेतकरी वेंकटरमण रेड्डी यांना तर लॉटरी लागली. ते चिंतामणी तालुक्यातील व्याजकूर गावाचे रहिवाशी आहेत. मंगळवारी 15 किलोचा टोमॅटोचा एका बॉक्ससाठी त्यांना 2200 रुपये मिळाले. गेल्या दोन वर्षांत त्यांना हा सर्वाधिक भाव मिळाला. एमपीएससी मार्केटमध्ये ते टोमॅटोचे 54 बॉक्स घेऊन गेले होते. त्यातील 26 बॉक्सला हा उच्चत्तम भाव मिळाला. टोमॅटोच्या उत्पादनातून त्यांना 3.3 लाख रुपये नफा मिळाला. त्यांच्याकडे एक एकर शेती आहे.