तुरीच्या उत्पादनात विक्रमी वाढ, जालन्यातील उत्पादकता नागपूरच्या बरोबरीने, कशामुळे झाली ही क्रांती?
तूर पीक अंतिम टप्प्यात असताना झालेल्या अवकाळी पावसामुळे व मर रोगामुळे उत्पादनात मोठी घट होईल असाच अंदाज होता मात्र, तुरीच्या उत्पादनाच्या बाबतीत सर्व तर्क-वितर्क हे फोल ठरले असून प्रतिकूल परस्थितीमध्ये हेक्टरी विक्रमी उत्पादन शेतकऱ्यांना मिळालेले आहे. सर्वसाधारण हेक्टरी 7 ते 8 क्विंटलचे उत्पादन मराठवाड्यात अपेक्षित आहे. परंतू, जालन्यामध्ये नागपूरच्या बरोबरीने हेक्टरी 15 क्विंटलचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळालेले आहे.
जालना : ( Kharif Season,) खरीप हंगामाबाबत सर्व काही नुकसानीची ठरत असताना मात्र, जालना जिल्ह्यात एक बाब सकारात्मक झाली आहे. खरिपातील शेवटचे पीक असलेल्या तुरीची काढणीही अंतिम टप्प्यात आहे. (Toor Crop) तूर पीक अंतिम टप्प्यात असताना झालेल्या अवकाळी पावसामुळे व मर रोगामुळे उत्पादनात मोठी घट होईल असाच अंदाज होता मात्र, तुरीच्या उत्पादनाच्या बाबतीत सर्व तर्क-वितर्क हे फोल ठरले असून प्रतिकूल परस्थितीमध्ये हेक्टरी विक्रमी उत्पादन (Farmer) शेतकऱ्यांना मिळालेले आहे. सर्वसाधारण हेक्टरी 7 ते 8 क्विंटलचे उत्पादन मराठवाड्यात अपेक्षित आहे. परंतू, जालन्यामध्ये (Nagpur) नागपूरच्या बरोबरीने हेक्टरी 15 क्विंटलचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही आता भर पडणार आहे.
वाढत्या उत्पादनाबाबत कशी झाली क्रांती ?
जिल्ह्यात मोसंबीचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात होते. मात्र, मध्यंतरी 2012 ते 2016 च्या दरम्यान झालेल्या दुष्काळी परस्थितीमुळे बाग जोपासने मुश्किल झाले, त्यामुळे शेतकऱ्यांनी बागांची मोडणी करुन त्या क्षेत्रावर तुरीचे पीक घेण्यास सुरवात केली होती. मात्र, पीक पध्दतीमधील बदल पाहून जिल्हाभरातील शेतकऱ्यांना कृषी विभाग आणि कृषी संशोधन केंद्र बदनापूर व खरपूरी येथील केंद्राचे कायम मार्गदर्शन राहिले होते. त्यामुळे गेल्या पाच वर्षापासून येथील तुरीची उत्पादकता वाढत आहे. सन 2020 मध्ये रेवगाव येथील शेतकऱ्याने तर एकरी 14 क्विंटलचे उत्पादन घेतले होते. तेव्हापासून उत्पादन वाढीची स्पर्धा लागली असून यंदा तर हेक्टरी 15 क्विंटलचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेतलेले आहे.
खर्च कमी अन् कृषी केंद्राच्या वाणाचा परिणाम
उत्पादन वाढीसाठी सर्वात महत्वाचा घटक ठरत आहे तो पेरणी करिता कोणत्या वाणाचा वापर केला जात आहे. जिल्ह्याभरात बदनापूर येथील संशोधन केंद्राच्यावतीने पुरवण्यात येणारेच तुरीचे वाण वापरले जाते. येथील भौगोलिक स्थिती, शेतजमिनीची उत्पादकता याची माहिती या केंद्राला झाल्याने उत्पादन वाढीच्या अनुशंगानेच वाणाची निर्मिती केली जाते. शिवाय शेतकऱ्यांच्या शेती शाळा, सिंचनाबद्दल मार्गदर्शन, रोगराईचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन यामुळेच उत्पादनात वाढ झाली आहे.
असे आहे राज्यातील तूरीचे उत्पादन
राज्यात सर्वाधिक तुरीची उत्पादकता ही नागपूर विभागात घेतली जाते. पण आता जालना जिल्ह्यातही नागपूरप्रमाणेच उत्पादकता घेतली जात आहे. हेक्टरी तब्बल 15 क्विंटल उत्पादनामुळे शेतकऱ्याच्या अर्थार्जनात मोठी वाढ होणार आहे. एकीकडे अवकाळी पाऊस आणि मर रोगामुळे शेतकऱ्यांनी तूर पीक काढणीविनाच सोडून दिले तर दुसरीकडे जालना जिल्ह्यात अशा प्रकारे विक्रमी उत्पादकता मिळत आहे. त्यामुळे मराठवाड्यातही शेती पध्दतीमध्ये मोठा बदल होत आहे.